– अधिकारी–कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत; तब्बल ४१ लाख ७९ हजार ९३२ रुपयांची मदत
The Exposer
नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. नागपूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोलाचा हातभार लावला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने एक दिवसाचे वेतन मदतनिधीसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या पुढाकाराने पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि अंमलदारांनी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. या सामूहिक योगदानातून तब्बल ४१ लाख ७९ हजार ९३२ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला.
कर्तव्य बजावताना कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस दल सामाजिक संकटाच्या काळातही समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांवर संकट कोसळले असताना पोलिसांनी आपल्या वेतनातील वाटा देत मदतीचा हात पुढे केला आहे.
केवळ कायद्याचे रक्षक नव्हे, तर संकटातील शेतकऱ्यांचेही आधारस्तंभ! नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या या योगदानातून माणुसकी आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















