चंद्रमणी नगर बुद्धविहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात!

– काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांची बुद्धविहाराला सदिच्छा भेट; महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

The Exposer
नागपूर : चंद्रमणी नगर येथील मुख्य बुद्धविहारात गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वर्षावास समापन कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा दक्षिण नागपूरचे नेते अतुल लोंढे पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून बुद्धविहाराला सदिच्छा भेट दिली.

यावेळी त्यांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून बुद्धवंदना केली. विशेष म्हणजे, चंद्रमणी नगर येथील हे बुद्धविहार पु. महाथेरो चंद्रमणी यांच्या नावाने ओळखले जाते. नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा ऐतिहासिक मान पु. महाथेरो चंद्रमणी यांना लाभला होता.

कार्यक्रमाचे आयोजन समितीचे प्रमुख संजय नगराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी संजय नगराळे, बहादूरे भाऊ व इतर पदाधिकाऱ्यांनी अतुल लोंढे पाटील यांचे पंचशील दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या प्रसंगी ब्लॉक क्रमांक ६ चे अध्यक्ष रमेश ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे महासचिव प्रफुल्ल भाजे, माजी शहर महासचिव सुनील पाटील, भगवान कांबळे, विकास नारायणे, विजय कस्तुरे, अनिस हजारे, संजय घोडके, सौरभ गजघाटे, लिलाधर भाऊ खैरकर, राजेश साखरकर, जगदीश जुमळे, राजेश रामटेके, विजय जीवने, बापू कळमकर, कांबळे ताई, बोंदाडे ताई यांच्यासह बुद्धविहारातील उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्षावास समापनाचे औचित्य साधून यावेळी महाभोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. या महाभोजनदानाचा लाभ संपूर्ण वस्तीतील नागरिकांनी घेतला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More