– भगवान श्रीकृष्णांचा अवमान केल्याचा ऍड. अक्षय समर्थ यांचा आरोप; भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
The Exposer
नागपूर : प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा धार्मिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची तुलना करताना श्रीकृष्णांबाबत आक्षेपार्ह व अनादरपूर्ण वक्तव्य केल्याचा आरोप करीत ऍड. अक्षय सुभाष समर्थ यांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ऍड. समर्थ यांच्या तक्रारीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित श्रीरामकथा कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी कथितरीत्या भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांची तुलना करणारी वक्तव्ये केली. त्यांनी ‘हमारे राम सीधे हैं, तुम्हारे कृष्ण टेढ़े हैं’ असे विधान केले. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या दिव्य देहबोली, रूप आणि चालण्याच्या पद्धतीबाबत टिप्पणी केली. एवढेच नव्हे, तर श्रीकृष्णांच्या रासलीलेची तुलना भगवान श्रीरामांच्या धनुष्यधारणेशी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
श्रीकृष्णांच्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

तक्रारीत नमूद केल्यानुसार, भगवान श्रीकृष्णांच्या विविध दिव्य लीलांची तुलना भगवान श्रीराम यांच्या कार्याशी अशा पद्धतीने करण्यात आली की, त्यामुळे अनेक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. मोठ्या जनसमुदायावर प्रभाव असलेल्या धार्मिक प्रवचनकाराने सार्वजनिक व्यासपीठावर अशा प्रकारची विधाने करणे अनुचित असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
सदर कार्यक्रमातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचे प्रसारण टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवर झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात यूट्यूबवरील व्हिडिओची लिंकही तक्रारीसोबत जोडण्यात आली आहे.
कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत कारवाईची मागणी
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ हे धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने केलेल्या जाणूनबुजून व द्वेषपूर्ण कृत्यांशी संबंधित आहे, तर कलम ३०२ हे धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारण्यासंदर्भात आहे. या दोन्ही कलमांमधील कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने संबंधित वक्तव्यांची तपासणी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यामध्ये, तक्रार अधिकृतरीत्या स्वीकारून पोलीस अभिलेखात नोंद करावी. करेरा येथील श्रीरामकथा कार्यक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळवून तपासणी करावी. कथित वक्तव्यांचा नेमका संदर्भ, उद्देश आणि संपूर्ण पार्श्वभूमी तपासावी. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवावा. या प्रकरणात करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. आदी मागण्याचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, कथित घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली असली, तरी तक्रारदार नागपूर येथील रहिवासी असून संबंधित व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी तो पाहिल्याने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणातील अधिकारक्षेत्र आणि पुढील तपासाबाबत पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
धार्मिक वक्तव्यांच्या मर्यादेवर पुन्हा प्रश्नचिन्ह!
या तक्रारीमुळे धार्मिक व्यासपीठांवरून होणाऱ्या वक्तव्यांची सामाजिक जबाबदारी आणि धार्मिक भावनांचा आदर राखण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कोणत्याही आराध्य दैवताचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नसावा, अशी भूमिका तक्रारदाराने मांडली आहे.
दरम्यान, ऍड. अक्षय समर्थ यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात ही तक्रार सादर केली असून, त्यावर पोलिसांकडून नेमकी कोणती कायदेशीर भूमिका घेतली जाते आणि गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















