– महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त १० महत्त्वपूर्ण उपक्रमांचे निवेदन
– नामकरणाचा प्रस्ताव शासनाने पारित करण्याची मागणी
The Exposer
नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुणे शहराचे नामकरण ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. पुणे शहराला महात्मा ज्योतिबा फुलेनगर हे नाव देण्याबाबत राज्य सरकारने अधिकृत प्रस्ताव पारित करून पुढील कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका मोर्चाने निवेदनातून मांडली आहे.

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या शिष्टमंडळाने रामगिरी, नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महात्मा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त राज्य शासनाने राबवावयाच्या दहा महत्त्वपूर्ण उपक्रमांचे निवेदन सादर केले. यामध्ये पुणे शहराचे ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ नामकरण करण्याच्या मागणीला विशेष प्राधान्य देण्यात आले.
निवेदनातील अन्य मागण्यांमध्ये महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे एक दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करून त्यांच्या कार्यावर चर्चा घडवून आणणे, तसेच ११ एप्रिल २०२७ रोजी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेष आमसभा घेऊन महात्मा फुले यांच्या विचारांचा गौरव करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय प्रागतिक, प्रबोधनात्मक आणि विकासात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी ‘सत्यशोधक भूषण’ पुरस्कार सुरू करणे, गुणवंत व्यक्तींसाठी मानधन अथवा मासिक पेन्शन योजना राबविणे, बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून ‘सत्यशोधक सामूहिक विवाह सोहळा’ योजना सुरू करून स्वयंसेवी संस्थांना अनुदान देणे, पुण्यातील महात्मा फुले यांच्या समताभूमीवर आकर्षक रोषणाई करणे, राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये महात्मा फुले अध्यासन सुरू करणे, तसेच जिल्हा परिषद शाळांसाठी ‘महात्मा फुले शाळा गुरुवर्य अनुदान पुरस्कार’ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका आणि विधिमंडळ सदस्यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी आयोजनासाठी शासनाने समिती स्थापन केली असून विविध उपक्रमांचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने मांडलेल्या दहा मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मुख्य संयोजक नितीन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात केंद्रीय महात्मा फुले द्विशताब्दी उत्सव आयोजन समितीचे सदस्य अविनाश ठाकरे, ओबीसी मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते ऍड. अशोक यावले, नागपूर शहर अध्यक्ष राजेश कुंभलकर, ओबीसी कर्मचारी नेते इंजि. संजय भोगे आणि इंजि. संतोष नारसेकर यांचा समावेश होता.
ऐतिहासिक योगदानाचा गौरव केवळ जयंती उत्सवापुरता नसावा- नितीन चौधरी
महात्मा फुले यांनी सामाजिक समता, स्त्रीशिक्षण, शेतकरी आणि वंचितांच्या हक्कांसाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव केवळ जयंती उत्सवापुरता मर्यादित न राहता तो शासनाच्या ठोस निर्णयांतून प्रतिबिंबित व्हावा. पुणे शहराला ‘महात्मा ज्योतिबा फुलेनगर’ हे नाव देण्याचा निर्णय त्यांच्या विचारांना आणि कार्याला दिलेली ऐतिहासिक आदरांजली ठरेल, अशी अपेक्षा राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















