– ३ हजार बंद्यांसाठी दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; बंद्यांनीही गायली गाणी, धरला नृत्यावर ठेका
The Exposer
नागपूर : कारागृह म्हणजे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून, व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे सुधारणा व पुनर्वसनाचे केंद्र असू शकते, याचा प्रत्यय नागपूर मध्यवर्ती कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमातून आला. दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त ६ व ७ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या विशेष उपक्रमाने कारागृहातील बंद्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलविले.
महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य असलेल्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून कारागृहात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून बंद्यांच्या मानसिक पुनर्वसनासोबत त्यांच्या जीवनात सकारात्मकता, आशावाद आणि आनंदाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात सुमारे ३ हजार बंदी असल्याने एकाच दिवशी सर्वांसाठी कार्यक्रम आयोजित करणे शक्य नव्हते. त्यामुळे ६ नोव्हेंबर रोजी ‘हॉट बिट म्युझिकल ग्रुप, नागपूर’ आणि ७ नोव्हेंबर रोजी ‘हार्मोनी इव्हेंट्स, नागपूर’ यांच्या माध्यमातून दोन दिवस हा सांस्कृतिक सोहळा पार पडला.
कार्यक्रमात संस्थांच्या कलाकारांनी मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण करून बंद्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, काही बंद्यांनीही स्वतः गाणी सादर करीत आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले. सणाच्या दिवशी कुटुंबीयांपासून दूर असलेल्या बंद्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला. गीतांच्या तालावर बंद्यांनी उत्स्फूर्तपणे नृत्य करीत कार्यक्रमाचा आनंद लुटला. कारागृहाच्या वातावरणात काही काळ आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेची पहाट उजाडली.
‘आयुष्यातील हा काळ तुमच्या संपूर्ण आयुष्याची व्याख्या ठरू देऊ नका!’
कार्यक्रमादरम्यान कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी बंद्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सण आणि उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करतात. बंद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सन्मानाने आणण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व मोठे आहे. दुसऱ्याला माफ करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच स्वतःला बदलण्याची संधी देणेही महत्त्वाचे आहे. आयुष्यातील हा कठीण काळ संपूर्ण आयुष्याची ओळख बनू देऊ नका. मनात बदलाची इच्छा आणि कृती करण्याची तयारी असेल, तर नव्या आयुष्याची सुंदर पहाट नक्कीच उगवू शकते. दिवाळीच्या निमित्ताने मनात आशेचा आणि आत्मविश्वासाचा दिवा लावून नव्या आयुष्याचा संकल्प करा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
हा कार्यक्रम कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी अतिरिक्त अधीक्षक दीपा आगे, उपअधीक्षक श्रीधर काळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी मनोहर भोसले, वामन निमजे, धम्मदीप जोगदंडे, नितीन बिसरागार, प्रकाश लोमटे, विजय हिवाळे, तुरुंगाधिकारी श्रेणी-१, उमेश गुंडे, संतोष मदने तसेच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने बंदी उपस्थित होते.
‘हॉट बिट म्युझिकल ग्रुप’च्या संयोजिका संजीवनी बुटी, प्रशांत शहारे, संजय बुटी, ममता पोहनकर, गायक कलाकार रवी पाटील, हंगाम गायकवाड, राजेश पनपालिया, विकास पाटील, प्रवीण अडमने, हर्षना बिरे तसेच ‘हार्मोनी इव्हेंट्स’चे संयोजक राजेश समर्थ, गायक दिनेश उईके, स्वाती खडसे, आर्या विजय, प्रमिला मानमोडे आणि मीना खालोडे यांनी हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण केले.
शिक्षेसोबत सुधारणा, पश्चात्तापासोबत परिवर्तन आणि निराशेसोबत आशेचा किरण देणारा नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा ‘दिवाळी पहाट’ उपक्रम बंद्यांच्या पुनर्वसनाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरला.
Author: संतोष तायडे
संपादक















