वाढदिवसाच्या आनंदावर रक्तरंजित विरजण! फटाके फोडण्यास विरोध केल्याने तरुणाची चाकूने वार करून हत्या

– देवनगर चौकातील थरारक घटना; अक्षय मडावी व दोन ते तीन साथीदारांविरुद्ध बजाजनगर पोलिसांत गुन्हा दाखल

The Exposer
नागपूर : वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या तरुणांच्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर चौकात घडली. फटाके फोडण्यास विरोध केल्याच्या कारणावरून हा रक्तरंजित प्रकार घडल्याची माहिती पोलिसांत दाखल तक्रारीतून समोर आली आहे. अमन ऊर्फ बॉबी सुनील सपाटे (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी अक्षय गंगाधर नौकरकर (वय ३२, रा. प्लॉट क्र. ३३, देवनगर, कॅपिटल जिमच्या बाजूला, बजाजनगर, नागपूर) हे त्यांचे मित्र अमन ऊर्फ बॉबी सुनील सपाटे (रा. प्लॉट क्र. १४, जयभोले सोसायटी, पिपळा फाटा, हुडकेश्वर) आणि प्रसाद राऊत (रा. देवनगर, नागपूर) यांच्यासह वाढदिवसानिमित्त जात होते.

यावेळी बजाजनगर हद्दीतील देवनगर चौकात ज्यूसच्या दुकानासमोर त्यांच्या कारजवळ काही तरुण फटाके फोडत होते. कारचालक असलेल्या फिर्यादीच्या मित्राने त्यांना फटाके फोडण्यास विरोध करून हटकले. याचा राग आल्याने फटाके फोडणारा आरोपी अक्षय मडावी आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांनी फिर्यादीच्या मित्रांसोबत वाद घातला.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी संगनमत करून अमन ऊर्फ बॉबी याच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी अक्षय मडावी व त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा शेवट एका तरुणाच्या मृत्यूत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More