नागपूर पोलीस दलात मोठी खांदेपालट! तीन पोलीस उपायुक्तांसह तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

– पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे प्रशासकीय बदल्यांचे आदेश; लकडगंज, सदर, सक्करदरा आणि सीताबर्डी विभागांच्या जबाबदाऱ्यांत बदल

The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ९ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या दोन स्वतंत्र आदेशांनुसार तीन पोलीस उपायुक्त (DCP) आणि तीन सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलामुळे शहरातील परिमंडळ क्रमांक २ आणि ५ यांच्यासह विविध पोलीस विभागांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे.

तीन पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांची पोलीस मुख्यालयातून परिमंडळ क्रमांक ५ येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची परिमंडळ क्रमांक ५ मधून परिमंडळ क्रमांक २ येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांची परिमंडळ क्रमांक २ मधून पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

सहायक पोलीस आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल

सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद नानासाहेब पारवे यांची लकडगंज विभागातून सदर विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सीताबर्डी विभागाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त महेश कृष्णराव चव्हाण यांची सक्करदरा विभागातून लकडगंज विभागात बदली करण्यात आली आहे.
सहायक पोलीस आयुक्त सुनीलसिंग चंद्रसिंग पवार यांची सीताबर्डी विभागातून कोतवाली विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सक्करदरा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. नरेश हिवरे, सहायक पोलीस आयुक्त, अजनी विभाग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश

संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होऊन कार्यभार स्वीकारावा तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रशासकीय फेरबदलामुळे नागपूर शहर पोलीस दलातील महत्त्वाच्या विभागांच्या कामकाजात नवे नेतृत्व कार्यरत होणार असून, आगामी काळात या बदलांचा शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More