दिवाळीच्या पहाटे बेसात शिक्षक दाम्पत्याची जीवनयात्रा संपली! एकाच पंख्याला दोन गळफास; रेवतीनगरमध्ये खळबळ

– दोन महिन्यांपूर्वीच केला होता आंतरधर्मीय प्रेमविवाह; आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू

The Exposer
नागपूर : दिवाळीच्या आनंदोत्सवात बेसा येथील रेवतीनगर परिसरात एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली. खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात एकाच पंख्याला स्वतंत्र ओढण्या बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मनीष प्रल्हाद गणवीर (वय ३८) आणि सोनाली (वय ३५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. दिवाळीच्या दिवशी सकाळी सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, दाम्पत्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे. बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच केला होता प्रेमविवाह

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यात एका खासगी कंपनीद्वारे संचालित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते. पहिला संसार मोडल्यानंतर एकत्र काम करताना त्यांची ओळख झाली आणि पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर दोघांनी कुटुंबीयांच्या संमतीने ऑगस्ट २०२६ मध्ये आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. नव्या आयुष्याची सुरुवात केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच या दाम्पत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त दोघेही गडचिरोलीहून नागपूरला आले होते. मात्र, दिवाळीच्या आनंदाऐवजी त्यांच्या घरी मृत्यूचे सावट पसरले.

नातेवाइकाला दिसले गॅलरीतून भयावह दृश्य

घटनेच्या वेळी मनीषच्या कुटुंबातील अन्य सदस्य बौद्धगया येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, मनीष आणि सोनाली यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी जयताळा येथील एकात्मतानगर परिसरात राहणारे नातेवाईक प्रशिक्ष अजय लांडगे (वय २६) यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

लांडगे हे घरी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अनर्थाची शंका आल्याने त्यांनी टीनशेडवर चढून गॅलरीतून घरात डोकावले. त्यावेळी मनीष आणि सोनाली यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. हे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने नातेवाइकांना आणि पोलिसांना माहिती दिली.

आत्महत्येमागील कारण काय? तपासातून उलगडणार गूढ

घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळून आलेली नाही. त्यामुळे दाम्पत्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेहांवर किरकोळ ओरखड्यांच्या खुणा आढळल्याची माहिती असून, त्याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये काही वाद झाला होता का, यासह विविध शक्यता तपासल्या जात आहेत. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अधिकृत तपास पूर्ण करणे आवश्यक आहे. दाम्पत्याच्या बहिणींनीही कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित असल्याचे सांगत या घटनेमागील कारणाबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.

पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. नव्याने संसार थाटलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या अशा दुर्दैवी अंतामुळे रेवतीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागलें आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More