– ९ डिसेंबरच्या भव्य मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजकांची बैठक; समाजाची एकजूट आणि आरक्षणाच्या भवितव्यावर होणार मंथन
The Exposer
नागपूर : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांच्या शासन स्तरावर विचाराधीन आहे. या निर्णयाचे अनुसूचित जाती समाजाच्या आगामी पिढ्यांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असून, विशेषतः शैक्षणिक संधी, आरक्षणाचे लाभ, सामाजिक प्रतिनिधित्व आणि समाजातील एकता व ऐक्य या महत्त्वपूर्ण बाबींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उपवर्गीकरणाच्या विषयावर समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी आणि प्रस्तावित आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
येत्या रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० वाजेपर्यंत दीक्षाभूमी, नागपूर येथे आयोजकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बेठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते जनार्दन मून राहणार आहे. या बैठकीत अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाचे संभाव्य परिणाम, आरक्षणाच्या लाभांवरील त्याचे परिणाम, समाजाची भूमिका, संघटनात्मक एकजूट आणि या विषयावर व्यापक जनजागृती करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, येत्या ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाच्या नियोजनालाही या बैठकीत प्राधान्य दिले जाणार आहे. मोर्चाची रूपरेषा, नियोजन, विविध संघटनांचा सहभाग, समाजबांधवांची उपस्थिती आणि आंदोलनाची पुढील दिशा याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.
उपवर्गीकरणासारखा संवेदनशील आणि समाजाच्या भवितव्याशी निगडित असलेला विषय केवळ वर्तमानापुरता मर्यादित नसून त्याचे परिणाम भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे या विषयावर सर्वांनी गांभीर्याने विचारमंथन करून आपली मते मांडावीत, तसेच समाजहिताच्या दृष्टीने संघटनात्मक समन्वय साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीला सर्व आयोजकांनी आवर्जून उपस्थित राहून आपले विचार व सहकार्य नोंदवावे, असे आवाहन दिनेश भाऊ गोडघाटे, मच्छिंद्र सावळे, राहुल दादा मून, विलासराव भालेकर, तुषार नंदागवळी आणि साहेबराव सिरसाट यांनी केले आहे. एकजूट हीच आपली ताकद! समाजाच्या भवितव्यासाठी संघटित होण्याचे आवाहन मच्छिन्द्र सावळे यांनी केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















