– दीक्षाभूमी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या बदनामीला ससाई जबाबदार; स्मारक समितीचे अध्यक्ष विलास गजघाटे यांचा आरोप
The Exposer
नागपूर : भदंत सुरेश ससाई यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, तसेच १९९० पासून जपान, थायलंड आणि अन्य देशांतून त्यांना प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विदेशी निधीची केंद्र सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष विलास गजघाटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
भदंत ससाई यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यात नागपूरच्या बौद्ध समाजाचे मोठे योगदान असल्याचे सांगत, त्यानंतर त्यांना विविध देशांतून प्राप्त झालेल्या विदेशी निधीचा विनियोग नेमका कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी करण्यात आला, याबाबत गजघाटे यांनी प्रश्न उपस्थित केले. विदेशी निधी नियमन कायद्यानुसार (FCRA) प्राप्त निधी निर्धारित उद्देशासाठीच खर्च करणे आणि त्याचा नियमानुसार हिशेब सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे १९९० पासून प्राप्त झालेल्या निधीचे स्रोत, खर्चाचा तपशील आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
हा निधी बौद्ध समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी, बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी अथवा सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरण्यात आला की अन्यत्र खर्च झाला, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, त्यांच्या संस्थेच्या नावावर असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या सुमारे १५० ते २०० एकर जमिनीच्या खरेदीसाठी निधी कुठून आला, या व्यवहारांचे स्वरूप काय आहे, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी भदंत ससाई यांचे ठोस आर्थिक योगदान नसल्याचा आरोप गजघाटे यांनी केला. त्यांच्या कार्यकाळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी केंद्रे सुरू करण्यात आली नाहीत, तसेच अपेक्षित सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमही राबविण्यात आले नाहीत. परिणामी, दीक्षाभूमी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालयाची प्रतिमा मलिन होत असून, वारंवार निर्माण होणाऱ्या वादांमुळे बौद्ध समाजात अस्वस्थता वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
भदंत ससाई यांच्याशी पूर्वी आपले अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध होते. दिवंगत रा. सु. गवई यांच्या निधनानंतर दीक्षाभूमीच्या अध्यक्षपदासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू असताना आपण स्वतः ससाई यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर अन्य सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे गजघाटे यांनी सांगितले. मात्र, सध्या ते कोणाच्या प्रभावाखाली काम करीत आहेत, हे समजत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या तीन वर्षांपासून चर्चेच्या माध्यमातून वाद मिटविण्याची आपली तयारी होती. त्यासाठी संवादाचे दरवाजे खुले ठेवले; मात्र चर्चेसाठी समोरून प्रतिसाद मिळाला नाही, असा दावाही त्यांनी केला. समितीच्या व्यवस्थापनासह शैक्षणिक संस्थांशी संबंधित बाबींवर आपले नियंत्रण असल्याचे सांगत, दीक्षाभूमीच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. संबंधित बँकेच्या व्यवहारांबाबतही नोटीस देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारकडे दोन प्रमुख मागण्या
भदंत सुरेश ससाई यांच्या भारतीय नागरिकत्वाबाबत कायदेशीर तरतुदींनुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. तसेच जपान, थायलंड आणि अन्य देशांतून प्राप्त झालेल्या विदेशी निधीचा विनियोग, संबंधित संस्थांचे आर्थिक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदीचे स्रोत यांची केंद्रीय गृह मंत्रालय व संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करावी. या दोन प्रमुख मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विलास गजघाटे यांनी सांगितले.
Author: संतोष तायडे
संपादक
















2 thoughts on “भदंत सुरई ससाई यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा; विदेशी निधीची चौकशी करा!”
आपण मुक्तपणे पत्रकारिता करीत आहेत,अशीच निडर ओत्रकारीत करून समाजाच्या प्रश्नांचा आवाज मोठा करीत राहावा.
खूप खूप सदिच्छा
धन्यवाद…