– ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’चा बनावट प्रतिनिधी बनून खंडणीचा धंदा; नागपूर ग्रामीण पोलिसांचा भोपालमधील कॉल सेंटरवर छापा, ३१ जणांना अटक
The Exposer
नागपूर : पत्रकारितेसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा मुखवटा धारण करून देशभरातील महिला सरपंचांना लक्ष्य करत लाखोंची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार नागपूर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बातमी प्रसिद्ध करून बदनामी करण्याची धमकी, जाहिरातीच्या नावाखाली पैशांची मागणी आणि पैसे न दिल्यास प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा इशारा… अशा पद्धतीने सुरू असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटवर पोलिसांनी थेट मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये धडक कारवाई केली. या प्रकरणात चार प्रमुख महिलांसह ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईने पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित खंडणीखोरीचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे.
‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’च्या नावाने खंडणीचा खेळ!
या रॅकेटमधील आरोपी देशभरातील ग्रामपंचायतींची माहिती मिळविण्यासाठी शासनाच्या महापंचायत पोर्टलचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले. आठ राज्यांतील महिला सरपंच आणि ग्रामसेवकांची नावे, मोबाईल क्रमांक यांची माहिती गोळा करून त्यांना लक्ष्य केले जात होते.
त्यानंतर संबंधित महिलांना फोन करून आपण भोपाळमधील ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’चे प्रतिनिधी असल्याचे सांगितले जात होते. ग्रामपंचायतीच्या विकासकामांची जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या नावाखाली तीन हजार रुपयांची मागणी केली जात होती. पैसे देण्यास नकार दिल्यास संबंधित सरपंचांविरोधात बदनामीकारक बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आहे.
महिला सरपंचांना बनविले लक्ष्य!
या रॅकेटमध्ये मोनिका लालसिंग सूर्यवंशी (वय २६), नेहा लालसिंग सूर्यवंशी (वय २३), अक्षरा मिलिंद अरक (वय २२) आणि कोमल मोहन मोरे (वय २३) या चार महिलांची प्रमुख भूमिका असल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील सरपंच मीना सुरेशसिंग सूर्यवंशी यांना ११ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या कालावधीत जाहिरातीच्या नावाखाली तीन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बातमी छापण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याच पद्धतीने सरपंच प्रभा गौतमारे यांच्याकडून ऑनलाइन ५०० रुपये स्वीकारण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
भोपाळमध्ये कॉल सेंटर; ३५ तरुणी कार्यरत!
या प्रकरणाचा तपास करताना नरखेड पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. भोपाळमधील हरवर्धन नगर, निशातपुरा आणि एमपी नगर परिसरातील ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.
तेथे तब्बल ३५ बहुभाषिक तरुणी काम करत असल्याचे आढळले. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांतील महिला सरपंचांची माहिती ६१८ नोंदींच्या रजिस्टरमध्ये संकलित करण्यात आली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, राजस्थानी आणि बिहारी भाषांचे ज्ञान असलेल्या तरुणींच्या माध्यमातून संबंधित सरपंचांशी संपर्क साधला जात होता.
सात लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत ५४ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, दोन संगणक, तीन प्रिंटर, ६१८ मोबाईल क्रमांकांचे रजिस्टर, छापील पत्रके, येस बँकेचा स्कॅनर, रिसीट स्लिप्स आणि चेकबुक असा एकूण सात लाख २९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर कारवाईला वेग
८ नोव्हेंबर रोजी लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक महिला सरपंचांनी या कथित खंडणीखोरीची तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या तक्रारींची तातडीने दखल घेत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. ही उल्लेखनीय कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अंकुश माने व पथकाने केली.
पत्रकारितेच्या नावाने खंडणीखोरी करणाऱ्यांना चाप कधी?
पत्रकारितेचे नाव पुढे करून जाहिरातीच्या बहाण्याने पैसे उकळणे आणि बातमीच्या धमकीने लोकप्रतिनिधींनाजाळ्यात ओढणे हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशा प्रवृत्तीमुळे प्रामाणिक पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात येते. मात्र, एका रॅकेटचा पर्दाफाश झाला म्हणून प्रकरण संपत नाही. या टोळीचे आर्थिक व्यवहार, राज्यनिहाय संपर्क, आणखी किती महिला सरपंचांची फसवणूक झाली आणि या कथित रॅकेटमागे आणखी कोणाचे हात आहेत, ही टोळी एकाकी जगणाऱ्या वृद्धाना शादी डॉट कॉमच्या नावाखाली ‘हनी ट्रॅप’ मध्ये सक्रिय आहे काय? याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















