– १९ सुवर्ण, १६ रौप्य अन् ३ कांस्य पदकांसह नागपूरच्या शिलेदारांचा जागतिक स्तरावर डंका
The Exposer
नागपूर : गोवा येथे पार पडलेल्या थायबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मध्ये दिल्ली पब्लिक स्कूल (DPS), मिहानच्या विद्यार्थ्यांनी पदकांची अक्षरशः लयलूट करीत नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत DPS मिहानच्या खेळाडूंनी तब्बल ३८ पदकांची ऐतिहासिक कमाई केली. यामध्ये १९ सुवर्ण, १६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
गोव्यातील पेड्डेम, म्हापसा येथील बॉक्सिंग हॉलमध्ये आयोजित या स्पर्धेत विविध वयोगटांतील खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज देत नागपूरच्या या युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याची आणि जिद्दीची छाप उमटवली.
सुवर्णपदकांवर १९ खेळाडूंची मोहोर!
समायरा जैस्वाल, अन्वी श्रीवास्तव, स्वेष्टिका एस., भार्वी मुडे, तनिष्का शाहू, सौम्या पापिनवार, प्रणित सिरसाट, अरहना बन्सोड, उर्वी गाडगे, कैवल्य पवार, शुभ्या तेम्भरे, जिया गोर, अनन्या एक्का, अथर्व सिन्हा, प्रद्न्येश किरणापुरे, जश पुगालिया, हृषिता शर्मा, तनिरिका चौधरी आणि आद्वित्या लुथाडे यांनी सुवर्णपदक पटकावले.
१६ खेळाडूंनी पटकावली रौप्यपदके!

किमाया राहुल झांबरे, तिश्या जैन, दानिया हिवांज, आफिया बेग, झायान चौधरी, मीरा कुमारी, शैवी भगत, सिद्धांत सिलोडिया, आरोही चिखले, सान्वी कांबळे, जिया ग्वालवंशी, इरा डोंगरे, अमायरा शामकुले, वैभव शुक्ला, आरव पाटील आणि निध्याथी भगत यांनी रौप्यपदकांची कमाई केली.
कांस्यपदक विजेते
अथेना जैस्वाल, आलोक मेहता आणि नैशा बावनकर यांनी कांस्यपदक पटकावत संघाच्या यशात मोलाची भर घातली.
प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशाची भरारी
या ऐतिहासिक यशामागे खेळाडूंची कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. प्रशिक्षक युगांत उगले (महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष तथा नागपूर अध्यक्ष) आणि कार्तिक मानेकर (नागपूर सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. माय नागपूर फेडरेशन तसेच अमॅच्युअर ट्रेडिशनल थायबॉक्सिंग असोसिएशन, नागपूर यांच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाले.
३८ पदकांनी नागपूरच्या क्रीडा वैभवात भर!

एका जागतिक स्पर्धेत ३८ पदकांची कमाई करणे ही DPS मिहानसाठी अभिमानास्पद उपलब्धी ठरली आहे. या यशाने विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण, आत्मविश्वास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची क्षमता अधोरेखित केली आहे. या युवा खेळाडूंच्या कामगिरीमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घवघवीत यशाबद्दल सर्व पदकविजेते विद्यार्थी, प्रशिक्षक आणि संबंधित संघटनांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, DPS मिहानच्या शिरपेचात जागतिक यशाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















