– नागपूर हायकोर्टातील ऐतिहासिक कलाकृती; चित्रकार संजय देठे, सचिन दुरडकर आणि कर्णबोधी मांडवे यांचे अथक परिश्रम

The Exposer
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधान मूल्यांचा गौरव करणारा ऐतिहासिक क्षण वर्ष २०१६ रोजी साकारला गेला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दर्शनी भागात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य तैलचित्र स्थापित करण्यात आले. विशेष म्हणजे, हे तैलचित्र अवघ्या सात दिवसांत तयार करून न्यायालयाला समर्पित करण्यात आले. आजही हे तैलचित्र नागपूर हायकोर्टात न्यायदानासाठी प्रेरणादायी ठरत असून संविधानाच्या मूल्यांची सतत आठवण करून देत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या तैलचित्राचे अनावरण २० एप्रिल २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे तत्कालीन प्रशासकीय न्यायमूर्ती न्या. भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तत्कालीन न्यायमूर्ती न्या. भूषण धर्माधिकारी, राज्याचे तत्कालीन महाधिवक्ता रोहित देव, तसेच न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती उपस्थित होते. याशिवाय नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील, उच्च न्यायालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद फरकाडे आणि न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी तैलचित्र साकार करणारे चित्रकार संजय देठे, सचिन दुरडकर आणि कर्णबोधी मांडवे यांचा न्या. भूषण गवई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या तिघा चित्रकारांच्या परिश्रमांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भव्य आणि आकर्षक तैलचित्र साकार होऊ शकले.
अवघ्या सात दिवसांत साकारले ११ फूट उंच भव्य तैलचित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे तैलचित्र तब्बल ११ फूट उंच आणि ५ फूट रुंद असून त्याची भव्यता पाहणाऱ्यांना थक्क करून सोडते. हे तैलचित्र तयार करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांतील तीन गुणी चित्रकार एकत्र आले. यामध्ये संजय देठे (चंद्रपूर), सचिन दुरडकर (बल्लारशाह) आणि कर्णबोधी मांडवे (नागपूर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही चित्रकार नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी राहिलेले आहेत. तिघांनीही दिवस-रात्र मेहनत घेत, रात्रीचा दिवस करून अवघ्या सात दिवसांत हे भव्य तैलचित्र पूर्ण केले. तैलचित्र तयार करताना त्यांनी नागपूर हायकोर्टाच्या इमारतीतील वातावरण, प्रकाश व्यवस्था, हवामान आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा सखोल अभ्यास केला. तैलचित्र पुढील ५० वर्षांहून अधिक काळ सुरक्षित आणि आकर्षक राहावे यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. यासाठी उच्च दर्जाचे रंग वापरण्यात आले. तसेच तैलचित्राच्या आतील भागात मजबूत स्टीलची रचना आणि बाहेरील बाजूस दर्जेदार लाकडी फ्रेमचा वापर करण्यात आला. त्यामुळे या तैलचित्राला कलात्मकतेसोबतच दीर्घायुष्यही प्राप्त झाले आहे.
चित्रकार कर्णबोधी मांडवे यांची महत्त्वपूर्ण भूमिका
या तैलचित्राच्या निर्मितीत चित्रकार कर्णबोधी मांडवे यांनी विशेष आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागपूरमधील एका नामांकित मुकबधिर शाळेत ते अनेक वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी असंख्य मुकबधिर विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे दिले आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून दिला. सेवानिवृत्तीनंतरही कर्णबोधी मांडवे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते अनेक गरजू व्यक्तींना मदत करीत असतात. त्यांच्या कार्याचा लाभ समाजातील अनेक घटकांना होत आहे.
कर्णबोधी मांडवे यांचे पुत्र मानव मांडवे यांनीही आपल्या वडिलांकडून चित्रकलेची प्रेरणा घेतली आहे. मात्र, पारंपरिक शैलींपेक्षा वेगळा विचार, आधुनिक तंत्र, वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि नावीन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून मानव मांडवे स्वतःची स्वतंत्र कलाशैली निर्माण करीत आहेत. त्यामुळे मांडवे कुटुंबाची चित्रकलेची परंपरा नव्या पिढीतही पुढे जात आहे.
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार बहाल केले — न्या. भूषण गवई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जात, धर्म, लिंग आणि इतर सर्व प्रकारचे भेद दूर सारत समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूलभूत तत्त्वे प्रस्थापित केली. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार बहाल केले असून लोकशाहीची खरी ताकद प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविली आहे.
राज्यघटनेने देशाला “एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य” हे लोकशाहीचे अमूल्य तत्त्व दिले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान संधी आणि न्याय मिळवून देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन तत्कालीन प्रशासकीय न्यायमूर्ती न्या. भूषण गवई यांनी या प्रसंगी केले होते.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमानंतर काही वर्षांतच न्या. भूषण गवई यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यामुळे नागपूर खंडपीठातील हा कार्यक्रम आणि त्यावेळी व्यक्त करण्यात आलेले विचार अधिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरले आहेत. आजही नागपूर हायकोर्टाच्या दर्शनी भागात विराजमान असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे भव्य तैलचित्र न्यायव्यवस्थेतील अधिकारी, वकील, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना संविधान, समता आणि न्यायाच्या मूल्यांची प्रेरणा देत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











