– पाच दिवस लोटूनही आरोपी मोकाट; अखेर 72 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, कोतवाली पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
The Exposer
नागपूर : महाल परिसरातील एका दुर्दैवी अपघाताने शहरात संतापाची लाट उसळली आहे. रविवारी पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बडकस चौकातून आयचीत मंदिराकडे जात असताना गजानन मंदिराजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने 72 वर्षीय मुकुंद बाभरे (रा. झेंडा चौक, महाल) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाभरे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून पाच दिवस उलटूनही आरोपी वाहनचालकाचा शोध लागलेला नाही. कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही तपासात अपेक्षित प्रगती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, “निष्पाप व्यक्तीचा जीव गेला, पण आरोपी अजूनही मोकाट का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अपघाताचे गंभीर स्वरूप आणि त्यानंतर झालेला मृत्यू लक्षात घेता आता या प्रकरणात अधिक कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संतप्त नागरिकांचा सवाल
“सीसीटीव्हीचे जाळे, तांत्रिक साधने आणि पोलिस यंत्रणा असतानाही पाच दिवस आरोपीचा शोध लागत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची?” मुकुंद बाभरे यांच्या मृत्यूनंतर आता हे प्रकरण केवळ अपघातापुरते मर्यादित राहिले नसून, पोलिसांच्या तपासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी वाहनचालकाला अटक करून मृताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











