भिडे वाड्यापासून राष्ट्रीय स्मारकापर्यंतचा लढा; फुले दाम्पत्याच्या कार्याला अखेर मिळतोय राष्ट्रीय गौरव!

– सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; पुण्यात युद्धपातळीवर सुरू स्मारकाचे बांधकाम

The Exposer
नागपूर : भारतातील स्त्रीशिक्षणाच्या इतिहासाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी याच ठिकाणी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला होता. आज त्याच पवित्र भूमीवर फुले दाम्पत्यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व असूनही अनेक वर्षे ही वास्तू दुर्लक्षित राहिली होती. स्मारक उभारणीचा प्रश्न वारंवार चर्चेत येत असला तरी प्रत्यक्ष निर्णय होत नव्हता. अशा परिस्थितीत नागपूरातील सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी हा विषय शासन दरबारी सातत्याने लावून धरला. त्यांनी विविध आंदोलन, निवेदने, उपोषणे आणि जनजागृतीच्या माध्यमातून भिडे वाड्याच्या जतनाची मागणी कायम ठेवली.

यासंदर्भात २०११ मध्ये नागपूर येथे विधानभवनासमोर फुले दाम्पत्यांच्या वारसांसह करण्यात आलेले उपोषण विशेष चर्चेत आले होते. सामाजिक न्यायासाठी सुरू झालेल्या या लढ्याला अनेक समाजघटकांचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा वाढत गेला आणि अखेर राज्य सरकारने भिडे वाड्याच्या जागेवर राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. २०२३ मध्ये जीर्ण झालेल्या जुन्या संरचनेचे पाडकाम करण्यात आले आणि त्यानंतर स्मारकाच्या उभारणीला गती मिळाली. सध्या या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त, फुले दाम्पत्यांच्या कार्याचा इतिहास जतन करणारे भव्य स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

भारतीय स्त्रीशिक्षणाचे पवित्र तीर्थक्षेत्र

भिडे वाडा हा केवळ एक ऐतिहासिक वाडा नसून भारतीय स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि बहुजन उन्नतीच्या चळवळीचे प्रेरणास्थान मानले जाते. याच ठिकाणाहून सुरू झालेल्या शिक्षणक्रांतीने लाखो महिलांना शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकाच्या रूपाने या वारसाचे संवर्धन होणे ही महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

भूषण दडवे यांच्या संघर्षाला मिळाले फळ 

वर्षानुवर्षे केलेल्या पाठपुराव्यानंतर आज भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या रूपाने नव्या इतिहासाची निर्मिती करत आहे. सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या लढ्यामुळेच हा प्रश्न शासनाच्या केंद्रस्थानी आला, अशी भावना फुले विचारांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.“जिथे भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळणे म्हणजे फुले दाम्पत्यांच्या सामाजिक क्रांतीला दिलेला खरा राष्ट्रीय सलाम आहे,” अशी प्रतिक्रिया समाजातील विविध स्तरांतून उमटत आहे.

भाग -1

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More