– भूषण दडवे यांचा दावा – पहिली मागणी आमचीच; आंदोलनामुळे राज्य शासनाला घ्यावी लागली दखल

The Exposer
नागपूर : पुण्यात उभारण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीमागे तब्बल दीड दशकाचा संघर्ष दडलेला आहे. फुले दाम्पत्यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी २०११ पासून सातत्याने लढा उभारला गेला, असा दावा महात्मा फुले सामाजिक न्याय परिषदेचे मुख्य संयोजक भूषण दडवे यांनी केला आहे.

दडवे यांच्या म्हणण्यानुसार, २०११ मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान फुले दाम्पत्यांच्या वारसांसह उपोषण आणि आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे प्रथमच फुले वारसांचा प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या दालनात पोहोचला. तसेच फुले दाम्पत्यांच्या वंशजांना समाजासमोर आणण्याचे कामही या चळवळीमुळेच घडून आले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची घोषणा केली होती.
त्याचवेळी स्मारकासाठी सुमारे ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र विविध प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियांमुळे प्रकल्पाला विलंब झाला. तरीही कार्यकर्त्यांनी आंदोलन, निवेदने, पाठपुरावा आणि जनजागृतीच्या माध्यमातून हा प्रश्न कायम जिवंत ठेवला. त्यामुळेच आज पुण्यात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा प्रकल्प प्रत्यक्षात आकार घेताना दिसत आहे. संघर्षाला मिळाले शासनस्तरीय मान्यतेचे शिक्कामोर्तब फुले वारसांच्या मागण्यांसाठी महात्मा फुले सामाजिक न्याय परिषदेने सातत्याने प्रयत्न केले.

तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय विधानसभेत मांडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचविला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध विभागांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले होते. उपोषणातून उभी राहिली राज्यव्यापी चळवळ २०११ मधील उपोषणामुळे हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला.
आंदोलनानंतर शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विविध विभागांमध्ये या प्रश्नावर व्यापक चर्चा सुरू झाली. पुढे पत्रव्यवहार, आंदोलने आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून या लढ्याला अधिक बळ मिळाले. यामध्ये भारिप सह विविध संघटनानी पुणे येथील भिडेवाडा समोर आंदोलने, तसेच पाठपुरावा करून शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधून घेतले होते हे विशेष.
Author: संतोष तायडे
संपादक











