– वंदे भारत एक्स्प्रेस येण्यापूर्वी धाडसी बचाव; तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार
The Exposer
नागपूर : प्रेमसंबंध तुटल्यानंतर नैराश्यात गेलेल्या २८ वर्षीय युवकाचे प्राण बेलतरोडी पोलिसांच्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे वाचले. मनिषनगर पुलाजवळील रेल्वे परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवकाला सुरक्षित बाहेर काढले आणि त्यानंतर त्याचे समुपदेशन करून पालकांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजश्रीनगर येथे राहणाऱ्या प्रतिक (वय २८) याचे अजनी परिसरातील २२ वर्षीय तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. काही काळ सर्व काही सुरळीत सुरू असताना प्रतिकने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, तरुणीने लग्नास नकार दिल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत गेले. अखेरीस तरुणीने संबंध संपुष्टात आणल्यानंतर प्रतिक मानसिक तणाव आणि नैराश्यात गेला.
युवकाच्या कुटुंबीयांनीही विवाहाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यालाही नकार मिळाल्याने तो अधिक खचला. या मानसिक अवस्थेत त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेळेवर मिळालेली माहिती ठरली जीवदानाचे कारण
सकाळी मनिषनगर पुलाजवळील रेल्वे परिसरात एक युवक धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती बेलतरोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ गस्तीवरील पोलिस हवालदार रुपेश साबळकर, नितीन तोंडे आणि केतन यांना घटनास्थळी रवाना केले. तीन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत युवकाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याचे समुपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
धाडसी कामगिरीबद्दल पोलिसांचा गौरव
युवकाचे प्राण वाचविणाऱ्या पोलिस हवालदार रुपेश साबळकर, नितीन तोंडे आणि केतन यांच्या तत्परतेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर यांनी कौतुक केले. त्यांच्या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीबद्दल तिन्ही कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
टीप: जर आपण किंवा आपल्या ओळखीतील एखादी व्यक्ती नैराश्य, भावनिक तणाव किंवा स्वतःला इजा करण्याच्या विचारांशी झुंज देत असेल, तर विश्वासू कुटुंबीय, मित्र किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी तातडीने संपर्क साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी मिळालेली मदत जीव वाचवू शकते.
Author: संतोष तायडे
संपादक











