– ५० ते ६० मीटरपर्यंत दुभाजक हटवल्याचा आरोप; वळण घेताना ट्रक अडकून वाहतूक खोळंबली
– सरकारी मालमत्तेच्या कथित नुकसानीकडे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिसांचे दुर्लक्ष?
The Exposer
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरातून जाणाऱ्या मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील कान्हाळमोह गावाजवळ एका पेट्रोल पंपाकडे वाहने वळविण्यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक अंदाजे ५० ते ६० मीटरपर्यंत तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूचा दुभाजक मोठ्या अंतरापर्यंत हटविण्यात आला आहे. महामार्गावरील दुभाजक हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा सक्षम विभागाची अधिकृत परवानगी घेण्यात आली आहे का, दुभाजकातील प्रवेशमार्ग नियमानुसार मंजूर आहे का आणि त्यासाठी आवश्यक वाहतूक सुरक्षा निकषांची पूर्तता करण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, संबंधित पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना एक ट्रक रस्त्यात अडकला. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे अनधिकृत किंवा अपुऱ्या नियोजनातून तयार करण्यात आलेला प्रवेशमार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत मोठ्या अंतरापर्यंत दुभाजक हटविल्यास अचानक वळण घेणारी वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक आणि अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो.
या प्रकरणाकडे कारदा पोलीस ठाणे तसेच राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नागपूरच्या रामनगर–हिलटॉप परिसरातील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय तसेच विधान भवनाजवळील प्रादेशिक कार्यालयाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
महामार्गावरील दुभाजक हा सार्वजनिक आणि सरकारी पायाभूत सुविधेचा भाग आहे. सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना त्यात बदल अथवा नुकसान करण्यात आले असल्यास, संबंधितांविरुद्ध लागू कायदे आणि नियमांनुसार कारवाई होऊ शकते. या प्रकरणात परवानगीशिवाय दुभाजक तोडण्यात आला का, कोणाच्या आदेशाने काम करण्यात आले, त्यासाठी कोणत्या विभागाची मंजुरी घेण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
या प्रकारामागे कोणाचे संगनमत किंवा प्रशासकीय दुर्लक्ष आढळल्यास जबाबदार व्यक्ती, संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अपघात किंवा जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करून दुभाजक नियमानुसार पूर्ववत करावा अथवा अधिकृत मंजुरी असल्यास तिची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

चौकशीच्या केंद्रस्थानी हे प्रश्न
पेट्रोल पंपासाठी दुभाजक हटविण्याची अधिकृत परवानगी कोणी दिली? अंदाजे ५० ते ६० मीटरचा दुभाजक हटविणे मंजूर आराखड्यानुसार आहे का? राष्ट्रीय महामार्ग विभागाने घटनास्थळाची पाहणी केली आहे का? ट्रक अडकल्यानंतरही संबंधित विभागाने कोणती कारवाई केली? सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्याची भरपाई आणि जबाबदारी कोणाची? वाहतूक सुरक्षिततेसाठी आवश्यक संकेतफलक व इतर उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? संबंधित पेट्रोल पंपाला महामार्गावरून थेट प्रवेश आणि निर्गमनाची वैध मंजुरी आहे का? असे विविध प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहॆ.
टीप : संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिस प्रशासनाची अधिकृत बाजू प्राप्त झाल्यानंतर ती सुध्दा जनहिताच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात येईल.
Author: संतोष तायडे
संपादक











