“संग्राम अजून संपलेला नाही…!”; जंतर-मंतरवरील लढ्याने दिला नवा संविधानिक संदेश

– ३६ दिवसांचा संघर्ष, लाठीचार्ज, अटकसत्र, तरुणीचे धाडस

– शिक्षण व लोकशाही वाचविण्यासाठी ऐतिहासिक हाक

The Exposer | नागपूर

“चिड संभाळून ठेवा,

चिरडलेल्या हुंकाराची…

संपली नाही लढाई,

यार हो या संगराची…”

मुंबईतील प्रसिद्ध कवी विवेक मोरे यांच्या या ओळी जणू दिल्लीतील जंतर-मंतरवर ३६ दिवस अखंड सुरू असलेल्या युवकांच्या आंदोलनाचा आत्माच ठरल्या. नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी न्याय, पारदर्शक शिक्षण व्यवस्था आणि उत्तरदायित्वाच्या मागणीसाठी उभ्या राहिलेल्या हजारो युवक-युवतींनी संघर्षाची नवी व्याख्या देशासमोर ठेवली.

रस्त्यावर उतरलेले हे तरुण केवळ स्वतःच्या परीक्षेसाठी लढत नव्हते; तर भविष्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हक्कासाठी उभे होते. पोलिसांच्या लाठीचार्जला, अटकसत्राला आणि दडपशाहीला न घाबरता त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू ठेवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संघर्ष देशाच्या कानाकोपऱ्यापासून जगभर पोहोचला. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

आंदोलनाचा सर्वाधिक चर्चेचा क्षण ठरला तो एका धाडसी तरुणीचा. आंदोलकांना पोलिस व्हॅनमध्ये घेऊन जात असताना तिने निर्भयपणे व्हॅनसमोर उभे राहत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तिचे धाडस हजारो विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनले. तिचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि युवा संघर्षाचा चेहरा ठरला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार शफी पठाण यांनी फेसबुकवर भारतीय संविधानाचे छायाचित्र शेअर करत “देख लिया जोर कितना बाजू-ए-कातिल में है…” या ओळींसह संविधान हाच संघर्षाचा सर्वात मोठा आधार असल्याचा संदेश दिला. तर विवेक मोरे यांच्या कवितेने हा संघर्ष एका दिवसाचा नसून परिवर्तनासाठीचा प्रदीर्घ प्रवास असल्याची जाणीव करून दिली.

या आंदोलनाने देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास आणि शासनाच्या उत्तरदायित्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अनेकांच्या मते, ही केवळ नीट परीक्षेची लढाई नव्हती; ती देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याची, समान संधीची आणि लोकशाहीतील उत्तरदायित्वाची लढाई होती.

या संघर्षात युवकांनी एक परीक्षा जिंकली असेल; पण देशातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी त्यांना भविष्यात अशाच अनेक “आंदोलनरूपी परीक्षा” द्याव्या लागू शकतात. इतिहास साक्षी आहे—मोठे बदल एका आंदोलनाने होत नाहीत; ते सातत्यपूर्ण संघर्षातून घडतात.

आज जंतर-मंतरवरील हा संघर्ष देशातील प्रत्येक तरुणाला एक संदेश देऊन गेला आहे—

“संविधान हातात, सत्य सोबत आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य मनात असेल, तर कोणतीही सत्ता कायमची अजेय नसते. आंदोलन संपू शकते; पण न्यायासाठीचा संग्राम कधीच संपत नाही.”

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More