– २४ तास कडक पोलीस बंदोबस्त, प्रत्येक चौकात चेकपोस्ट
– दृश्यमान पोलीसिंगमुळे नागरिकांचा विश्वास अधिक बळकट
The Exposer
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी धडाकेबाज पाऊल उचलले आहे. शहरभर २४ तास कडक पोलीस बंदोबस्त, सातत्यपूर्ण पेट्रोलिंग आणि दृश्यमान पोलीसिंग राबविण्याचे आदेश देण्यात आले असून, गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासोबतच नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यावर भर देण्यात आला आहे.

नवीन नियोजनानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान पाच चेकपोस्ट कार्यरत राहतील. याशिवाय चार बीट मार्शल आणि तीन पेट्रोलिंग मोबाईल सतत विविध मार्गांवर गस्त घालणार आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर रायफलधारी व लाठीधारी पोलीस कर्मचारी तैनात राहतील, तर पेट्रोलिंग पथके पूर्णपणे शस्त्रसज्ज असतील.
डिजिटल पोलीसिंगवर भर; QR कोडद्वारे प्रत्येक हालचालीवर वरिष्ठांची नजर
पोलीस यंत्रणा अधिक जबाबदार आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना QR कोड प्रणालीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पेट्रोलिंग, बीट ड्युटी आणि चेकिंगची नोंद डिजिटल पद्धतीने ठेवली जाणार असून, वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी प्रत्यक्ष तपासणी करून बंदोबस्ताच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.
QRT कायम सज्ज; नव्या पोलीस भरतींनाही मिळणार प्रत्यक्ष प्रशिक्षण
उपलब्ध मनुष्यबळाचे प्रभावी नियोजन करून प्रत्येक शिफ्टमध्ये सक्षम गस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) कायम सतर्क राहणार असून नियमित ड्रिल आणि सरावावर विशेष भर दिला जाणार आहे. नव्याने रुजू झालेल्या पोलीस भरतींनाही विविध पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी नियुक्त करून त्यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे.
‘प्रत्येक चौकात पोलीस’ – नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्तुत्य उपक्रम
महत्त्वाचे रस्ते, चौक, संवेदनशील परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीसांची दृश्यमान उपस्थिती वाढविण्यात येणार असल्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होऊन पोलीस प्रशासनावरील विश्वासही वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर शहरात राबविण्यात आलेले हे व्यापक सुरक्षा नियोजन केवळ बंदोबस्तापुरते मर्यादित नसून, आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम मनुष्यबळ आणि सततच्या देखरेखीच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुन्हेमुक्त वातावरण देण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











