– गवळीपुरातील संतापजनक प्रकार; बजरंग सेना आक्रमक
– आरोपी सागर सिरियाविरुद्ध सादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : केवळ दूध काढण्याच्या व्यावसायिक स्वार्थापोटी गायीला काठी व दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा परिसरात उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्याला विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीलाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी सागर चुन्नीलाल सिरिया याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पशु क्रूरतेविरुद्ध बजरंग सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी दूध काढण्यास उशीर झाल्याने सागर सिरिया याने एका गायीला काठी व दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. हा प्रकार पाहून स्थानिक विद्यार्थिनी यशोदा कटारिया हिने विरोध केला असता, तिच्याशी शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच गायींना कत्तलखान्यात विकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीकडे सुमारे ३० गायी असून, त्यांच्या निवाऱ्यासह चारा व देखभालीची योग्य व्यवस्था नसताना गायींना रस्त्यावर सोडले जात असल्याचा दावाही बजरंग सेनेने केला आहे. या प्रकरणी सदर पोलीसांनी गांभीर्याने घेत पशुक्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत आरोपी सिरीयविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सिरियासारख्या प्रवृत्तींना वेळीच लगाम घाला- शिवांशु महाराज
नागपुरात गाईंच्या कथित क्रूर छळाच्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. आरोपी सागर चुन्नीलाल सिरिया याच्यासह अशा प्रकारे मुक्या जनावरांवर अत्याचार करणाऱ्या शहरातील इतर संबंधितांनाही हा स्पष्ट इशारा आहे की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. नागपूर पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी. केवळ एका प्रकरणापुरती कारवाई मर्यादित ठेवू नये. अन्यथा गौ रक्षण आणि जनहितासाठी बजरंग सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा बजरंग सेनेचे राष्ट्रीय संयोजक (गौ रक्षा) शिवांशु महाराज यांनी दिला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















