२४ सेकंदांत ३९ व्यवहारांचा धडाका! ३३ जणांचे २.८७ कोटी लुटणाऱ्या सायबर टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश!

– बनावट कंपन्या, कॉर्पोरेट बँक खाती अन् फेक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर; मुंबईच्या बोरिवलीतून दोघांना बेड्या

The Exposer
नागपूर : शेअर बाजारात अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३३ जणांना २ कोटी ८७ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुंबईतील बोरिवली परिसरातून दोघांना अटक करून सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे उघडकीस आणले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये भूप मोहम्मद जेना (वय ३३, रा. बोरिवली, मुंबई) आणि यशा परमसुख जेना (रा. ब्यावर, जिल्हा अजमेर, राजस्थान) यांचा समावेश आहे. दोघेही मुंबईत वास्तव्यास होते. आरोपी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जाहिरातबाजी करून नागरिकांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत होते. सुरुवातीला गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देऊन विश्वास संपादन केला जात होता. त्यानंतर टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून बनावट एफटीएमएस आणि शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून नागरिकांची रक्कम हडपली जात होती.

या फसवणुकीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि सहपोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार सायबर उपायुक्त महेक स्वामी यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर बोरकुटे यांनी सहकाऱ्यांसह तपासाची सूत्रे हाती घेतली.

सहा दिवसांच्या तपासानंतर बोरिवलीत छापा!

तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांचे व्यवहार आणि आंतरराज्यीय तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलिसांनी बोरिवली परिसरात कारवाई करून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी स्वतःची बँक खाती न वापरता विविध बनावट खासगी कंपन्यांच्या नावाने कॉर्पोरेट बँक खाती उघडल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम वळती करण्यासाठी केला जात होता. पोलिसांनी आरोपींच्या बँक व्यवहारांची तपासणी केली असता अवघ्या २४ सेकंदांत ३९ व्यवहार करून ३८ वेगवेगळ्या खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम वळती केल्याचे समोर आले आहे.

सात बँकांची खाती; मोठा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून सात बँकांचे २६ चेकबुक, ३३ मोबाईल हँडसेट, ११ डेबिट कार्ड, तीन डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे, टोकन, दोन लॅपटॉप, सहा रबरी शिक्के, विविध व्यक्तींची ११ आधारकार्डे, पॅनकार्ड व मतदार ओळखपत्रे तसेच दोन स्टॅम्प पॅड जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये येस बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, आरबीएल बँक, एसबीआय आणि पीएनबी यांसह विविध बँकांच्या खात्यांचा समावेश आहे.

देशभरातील सायबर नेटवर्कचा शोध सुरू

आरोपींनी फसवणुकीची रक्कम कशा पद्धतीने वळती केली, या पैशांचे लाभार्थी कोण आहेत आणि या टोळीचे देशभरात आणखी किती साथीदार सक्रिय आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय सायबर नेटवर्कशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा खांबे, आकाश भुरटे, पोलीस अंमलदार तन्मय रायसिंग आणि स्वप्नाली टाक यांच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More