– प्रत्येकी १० लाखांची मागणी, जीवे मारण्याच्या धमक्या
– पोस्टाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न
The Exposer
नागपूर : उपराजधानीतील सराफा व्यापाऱ्यांना कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या देत खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागपूरच्या व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहरातील आठ नामांकित सराफा व्यापाऱ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची खंडणी मागणारी धमकीची पत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात आली. या पत्रांमध्ये जीवे मारण्याच्या धमक्यांचाही समावेश असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. विशेष म्हणजे, या धमकीपत्रांचे धागेदोरे खामला परिसरापर्यंत पोहोचले असून, एका संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे, दुर्गा ज्वेलर्सचे संचालक नेहाल तीनखेडे यांच्यासह आठ प्रमुख सराफा व्यापाऱ्यांना ही धमकीपत्रे पाठविण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव पुढे करून व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. मात्र, या प्रकरणाचा बिश्नोई गँगशी प्रत्यक्ष संबंध आहे की केवळ तिच्या नावाचा वापर करून स्थानिक पातळीवर हा कट रचण्यात आला, याचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे.
खामल्यातील पोस्ट बॉक्समधून धमकीपत्रे
पोलिसांच्या तपासात संबंधित पत्रे २०, २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी खामला परिसरातील पोस्ट बॉक्समधून टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. ही पत्रे प्रथम त्रिमूर्ती नगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचली. त्यानंतर इटवारी पोस्ट ऑफिसमार्फत संबंधित व्यापाऱ्यांपर्यंत वितरित करण्यात आली.
पत्रांवरील टपाल शिक्के, पोस्ट ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात येत असून, तिला ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. मात्र, तिचा गुन्ह्यातील सहभाग अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नाही.
पोस्टाद्वारे द्वेष पसरविण्याचा यापूर्वीही प्रयत्न!
या प्रकरणाच्या निमित्ताने नागपुरातील काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका गंभीर घटनेचीही आठवण होत आहे. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने पोस्टाच्या माध्यमातून जातीय द्वेष निर्माण होईल, अशा स्वरूपाची आक्षेपार्ह पत्रे काही लोकप्रतिनिधीना पाठविली होती. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामबाग-इमामवाडा परिसरातील एका नगरसेवकाने तक्रार दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
त्या प्रकरणाच्या तपासाची काही दिवस शहरात जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर शहरातील पोस्ट कार्यालयांमधील सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले. विशेषतः स्पीड पोस्ट आणि टपाल व्यवहारांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवण्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
आता पुन्हा पोस्टाच्या माध्यमातून धमकीची पत्रे पाठवून शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना लक्ष्य करण्यात आल्याने टपाल यंत्रणेतील सुरक्षा आणि देखरेखीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पूर्वीच्या घटनेतून नेमके काय धडे घेतले गेले? पोस्ट बॉक्समध्ये पत्र टाकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी यंत्रणा किती सक्षम आहे? तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर होत आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यापुढे प्रत्येक व्यक्तीचा आधार नंबर घेऊन पोस्टाचा व्यवहार करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
व्यापाऱ्यांची सुरक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत; पोलिसांसमोर मोठे आव्हान
धमकीपत्रांमुळे भयभीत झालेल्या सराफा व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपली व्यथा पोहोचविली होती. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासोबतच धमकीपत्रांमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणीही होत आहे.
बिश्नोई गँगचे नाव वापरून दहशत कोण पसरवत आहे?
आठ व्यापाऱ्यांची निवड नेमकी कशाच्या आधारे करण्यात आली? धमकीपत्रे पाठविण्यासाठी खामला परिसराचीच निवड का करण्यात आली? संशयित महिलेच्या मागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का? पत्रांमधील धमक्यांचा उद्देश केवळ खंडणी वसूल करणे होता की शहरात मोठी दहशत निर्माण करणे, याचाही तपास होणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सूत्रधारांना बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान नागपूर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















