– हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण व केक कारखान्यांची तातडीने तपासणी करण्याची मागणी; दोषींवर कठोर कारवाईचे साकडे
The Exposer
नागपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात शिवसेना (वंदनीय बाळासाहेब ठाकरे) वैद्यकीय मदत कक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात भेसळयुक्त मिठाई आणि खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, संबंधित विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या विदर्भ कार्यालयातर्फे विदर्भ प्रमुख प्रवीण लता बालमुकुंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल लाइन्स येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (विदर्भ विभाग) कृष्णा जयपूरकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि रुग्णसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर व जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फरसाण सेंटर, डेअरी, मिठाईची दुकाने तसेच सोनपापडी व केक कारखान्यांमध्ये खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आरोग्यास अपायकारक व भेसळयुक्त सामग्रीचा वापर करून आकर्षक पॅकिंगमध्ये मिठाई व खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
सणाच्या गोडव्याआड नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने मांडली. भेसळयुक्त पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
तीन प्रमुख मागण्यांवर प्रशासनाला घेरले
शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फरसाण कारखाने, मिठाईची दुकाने, सोनपापडी व केक कारखान्यांची तातडीने तपासणी करण्यात यावी. तपासणीमध्ये भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच प्रशासनाने कोणत्या ठिकाणी तपासणी केली आणि कोणाविरुद्ध कारवाई केली, याची सविस्तर माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यालयाला लेखी स्वरूपात द्यावी, अशा तीन प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
भेसळमुक्त नागपूर’ ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरली पाहिजे.** नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयावर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख सचिन शर्मा, चंद्रशेखर बावनकुळे, शहर प्रमुख महिमा शर्मा, उपजिल्हा प्रमुख शहाबुद्दीन शेख, उपशहर प्रमुख रमेश कोठेकर, नौशाद खान पठाण, विधानसभा संघटक रेणू देवेंद्र सिंह, शहर प्रमुख प्रेम बिरादर, विधानसभा संघटक राकेश बोकाडे, रामकुमार अग्रवाल, हर्षल वंजारी, प्रफुल्ल रामटेके, शहर प्रमुख शगुन बेंडेकर, उमेश बेंडेकर, विभाग प्रमुख अनिकेत पुंडलिके, प्रणय लोणारे, जिल्हा प्रमुख उषाताई धुर्वे यांच्यासह पदाधिकारी व रुग्णसेवक उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















