इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी आता डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे!

– महाराष्ट्र शासनाचा ३ नोव्हेंबर रोजी आदेश जारी

The Exposer
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय (मेयो), नागपूर येथील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार आता डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत शासन आदेश जारी केला आहे.

यापूर्वी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नेत्ररोगशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. रवी चव्हाण यांच्याकडे मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन आदेशानुसार ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे नागपूर येथील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार संस्थेतील अन्य सेवाज्येष्ठ प्राध्यापकांकडे सोपविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यानुसार प्रशासकीय कारणास्तव इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. अविनाश गावंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. गावंडे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथे रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, डॉ. अविनाश गावंडे यांना स्वतःच्या नियमित पदाच्या कर्तव्यांसह अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळावा लागणार आहे. यासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची आवश्यकता नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने कक्ष अधिकारी राजू राऊत यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या प्रशासकीय बदलामुळे मेयो रुग्णालयाच्या नेतृत्वाची जबाबदारी आता डॉ. अविनाश गावंडे यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज आणि रुग्णालयीन व्यवस्थापनाला कोणती दिशा मिळते, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More