अन् बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले…

– कधी कधी बालकाच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची नव्हे, तर एका छोट्याशा संवेदनशील कृतीची गरज असते…

संत्रा मार्केट परिसरातील फुटपाथवर राहणारे एक कुटुंब. पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःच्या पोटच्या मुलांनाच भीक मागायला लावणारे, त्यांच्या बालपणाची आणि निरागसतेची किंमत मोजून स्वतःचा उदरनिर्वाह करणारे माय-बाप… होय, माय-बापच! मुलं आपली जबाबदारी आहेत की आपणच त्यांच्या जबाबदारीचे ओझे आहोत, याचे भानही नसलेले अव्यवस्थित आणि व्यसनाधीन पालक.

रस्ताच घर… फुटपाथच अंगण… आणि असुरक्षिततेच्या सावलीत वाढणारी पाच बालके!

बालकांच्या सुरक्षिततेची आणि संरक्षणाची जाणीव असलेल्या स्वयंसेवी संस्था व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पाच वर्षांपूर्वी दोन बालिकांची सुटका करण्यात आली. दोघींनाही सुरुवातीला वेगवेगळ्या संस्थांमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, बालकांच्या भावनिक गरजा, परस्परांतील नातेसंबंध आणि त्यांच्या सर्वोत्तम हिताचा विचार करून बालकल्याण समितीने दोघींनाही एकाच संस्थेत दाखल करण्याचा संवेदनशील निर्णय घेतला.

काळ पुढे सरकत होता…

मोठ्या बालिकेने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली. तिच्या पुढील आयुष्याचा विचार करून अनुरक्षणाच्या लाभासाठी तिला राज्यगृहात पाठविण्यात आले. तेथे ती पुढील शिक्षण घेत आहे. तर दुसरी बालिका सध्या इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. मात्र, सुरक्षिततेच्या छायेत वाढत असतानाही तिच्या मनात एक खंत कायम होती… रस्त्यावर मागे राहिलेल्या आपल्या लहान बहिणी-भावांची!

मोठ्या बहिणीने बालकल्याण समितीकडे लेखी अर्ज केला. आपल्या सात वर्षांच्या बहिणीची आणि पाच वर्षांच्या भावाची असुरक्षित परिस्थितीतून सुटका व्हावी, यासाठी तिने स्वतः पुढाकार घेतला. यंत्रणेच्या मदतीने त्या दोघांनाही असुरक्षित वातावरणातून बाहेर काढण्यात आले आणि काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले. मात्र, तिच्या मनातील अस्वस्थता अद्याप संपली नव्हती.

“माझा आणखी एक भाऊ तिथेच मागे राहिला आहे…” ही खंत तिला सतत सतावत होती. काही महिने लोटले. एक दिवस ती कोणालाही काहीही न सांगता संस्थेतून निघून गेली. कारण एकच होते… आपल्या भावाचा शोध घेणे! मात्र, यावेळी तिला समजले की तिचे वडील हयात नाहीत आणि आई आपल्या भावाला तिथेच सोडून निघून गेली आहे. भावासाठी तिच्या मनात असलेली तळमळ पुन्हा जागी झाली. तिने चाइल्ड हेल्पलाइनच्या मीनाक्षी धडाडे यांच्याशी संपर्क साधला. यंत्रणेच्या मदतीने त्या बालकाला असुरक्षित ठिकाणाहून मुक्त करण्यात आले आणि बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

आता तो बालक समितीसमोर बसलेला होता…भेदरलेला… अस्वस्थ… डोळ्यांत अश्रूंचा सागर घेऊन! त्याला संस्थेत राहायचे नव्हते. त्याला हवे होते ते त्याचे मोकळे आकाश… फुटपाथवरील परिचित आयुष्य… आणि त्याच्या भावविश्वाचा भाग बनलेले नातेसंबंध! त्याच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारे अश्रू पाहताना मनात अनेक प्रश्न उभे राहिले. बालकाच्या सर्वोत्तम हितासाठी घेतलेला निर्णय त्याला नाखूश करत असेल, तर त्याच्या मनातील वेदना समजून घेणे ही आपली जबाबदारी नाही का?

बालकाला सुरक्षितता देणे म्हणजे केवळ त्याला असुरक्षित वातावरणातून बाहेर काढणे नव्हे. त्याच्या मनातील भीती, असुरक्षितता, नात्यांची ओढ आणि भावनिक गरजा समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ (JJ Act, 2015) आपल्याला बालकाचे सर्वोत्तम हित, त्याचे मत व सहभाग, कौटुंबिक जबाबदारी, सुरक्षितता आणि सन्मान यांचा विचार करण्याची दिशा देतो. बालकाच्या हितासाठी घेतलेला निर्णय त्याच्या भावनांचा आदर करणारा आणि त्याला सुरक्षिततेची जाणीव करून देणारा असणे आवश्यक आहे.

आणि मग…

त्या क्षणी एक छोटासा विचार मनात आला. त्या बालकाची त्याच्या दोन लहान बहिणी-भावांशी व्हिडिओ कॉलद्वारे भेट घडवून आणली. काही क्षणांपूर्वी अश्रूंनी भरलेले त्याचे डोळे अचानक आनंदाने उजळून निघाले! अश्रूंचा बांध तर फुटलाच; पण त्या अश्रूंमधूनच त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर, निरागस हसू फुलले.

ते हसू म्हणजे केवळ आनंद नव्हता. ते होते आपल्या माणसांना पुन्हा पाहिल्याचे समाधान… आपण एकटे नाही, याची झालेली जाणीव… आणि मनाला मिळालेला सुरक्षिततेचा छोटासा आधार! त्या क्षणाला कॅमेऱ्यात कैद करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. मात्र, बालकाच्या गोपनीयतेच्या आणि प्रतिष्ठेच्या अधिकाराचा सन्मान राखणे तितकेच महत्त्वाचे होते. म्हणून त्याची ओळख उघड होणार नाही, याची काळजी घेत हा क्षण जपला.

कारण बालकाच्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण आपल्याला जगासमोर मांडण्याचा अधिकार देत नाही. बालकाची गोपनीयता, प्रतिष्ठा आणि भावनिक सुरक्षितता जपणे ही आपली नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे.

बालकांच्या हितासाठी काम करताना एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली…

मुलं फार कठीण नसतात मुळी! त्यांना समजून घेण्यासाठी आपल्यात हवा असतो संयम…त्यांच्या भावनांचा स्वीकार करण्यासाठी हवी असते संवेदनशीलता…आणि त्यांना सुरक्षित, स्वीकारलेले व प्रेमळ नात्यांनी जोडलेले वाटावे, यासाठी हव्या असतात छोट्या-छोट्या प्रयत्नांची जोड!

कधी कधी एक व्हिडिओ कॉल…त्याच्याशी संबंधित एखादा जुना फोटो…त्याला समजेल, उमजेल अशा त्याच्याच भाषेत साधलेला आपुलकीचा संवाद…शरीर आणि कपडे अस्वच्छ असले, तरी त्याची जाणीव त्याला करून न देता साधलेली सुरक्षित जवळीक…त्याच्या नावाने त्याला प्रेमाने हाक मारणे आणि त्याच्या नावाचा सुंदर अर्थ सांगणे…अशा छोट्या-छोट्या कृती बालकाच्या मनातील भीती कमी करण्यासाठी पुरेशा ठरू शकतात.

बालकांचे संरक्षण म्हणजे केवळ गुन्हा दाखल करणे किंवा असुरक्षित परिस्थितीतून त्यांची सुटका करून त्यांना वाचवणे नव्हे; तर त्यांच्या मनाला समजून घेणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांना पुन्हा हसण्याचे कारण देणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन् आजच्या दिवशी… एका बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले! त्या बोलक्या डोळ्यांतून उमटलेले समाधान पाहताना बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदाचे खरे सार्थक झाल्याची मनोमन जाणीव झाली.

बालकाच्या चेहऱ्यावर फुललेले ते निरागस हसू… त्याच्या डोळ्यांत चमकलेला आनंद… आणि मनाला स्पर्शून जाणारा तो अविस्मरणीय क्षण! याच एका क्षणात आपल्या कामाचे खरे समाधान सामावलेले होते.

– छाया गुरव राऊत
  अध्यक्ष
  बालकल्याण समिती, नागपूर

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More