डीजेच्या दणदणाटानंतर आता फटाक्यांच्या प्रदूषणावरही पोलीस आयुक्तांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’!

– नागपूरकरांच्या आरोग्याची आणि सार्वजनिक सुरक्षिततेची काळजी घेणारा धाडसी निर्णय; विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यशैलीचे नागरिकांकडून कौतुक

The Exposer
नागपूर : सण-उत्सवांच्या नावाखाली वाढत चाललेला ध्वनिप्रदूषणाचा उन्माद रोखण्यासाठी डीजेवर निर्बंध घालण्याची ठाम भूमिका घेतल्यानंतर आता दिवाळीतील फटाक्यांच्या अतिवापरावरही नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नव्हे, तर नागरिकांचे आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक सुरक्षिततेचे भान ठेवणारे नेतृत्व शहराला मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार ६ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशानुसार पेट्रोल पंप, गॅस सिलिंडर गोडाऊन, केरोसीन डेपो, फटाक्यांची दुकाने, ज्वालाग्राही पदार्थांचे साठे आणि रासायनिक पदार्थांच्या डेपोंपासून २०० फुटांच्या परिसरात फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि न्यायालयांसारख्या शांतता क्षेत्रांमध्येही फटाके फोडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात धूर, आवाज आणि कचरा निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले असून, केवळ मान्यताप्राप्त ग्रीन फटाक्यांच्या वापरास प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. उडणारे आकाशकंदील अर्थात फ्लाइंग लँटर्न्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन ध्वनिप्रदूषणाविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर आता फटाक्यांच्या बाबतीतही दाखविलेली तत्परता चर्चेचा विषय ठरत आहे.

सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य महत्त्वाचेच; मात्र त्यासाठी दुसऱ्यांच्या आरोग्याचा, शांततेचा आणि जीविताचा बळी का? हा मूलभूत प्रश्न पोलीस आयुक्तांच्या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.

पोलीस प्रशासनाने केवळ आदेश काढण्यापुरते मर्यादित न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत होत असून, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त नागपूरच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More