– मनोनीत नगरसेवक निधीतून चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी घेणार पुढाकार
The Exposer
नागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील छत्रपती चौक ते मानेवाडा चौक मार्गावरील ‘प. पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य व आकर्षक ‘म्युरल वॉल आर्ट’ स्वरूपातील भिंतीचित्र उभारून चौकाचे कायमस्वरूपी सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नगरसेवक केतन विकास ठाकरे यांना सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळातर्फे नुकतेच निवेदन सादर करण्यात आले.
सदर चौकाला नागपूर महानगरपालिकेमार्फत अधिकृतपणे ‘प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक’ असे नाव देण्यात आले असून, महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिलेखातही त्याची नोंद आहे. या चौकाला सामाजिक, शैक्षणिक आणि संविधानवादी चळवळीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे विविध उपक्रम, संविधान दिन, जयंती आणि सामाजिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
मात्र, एवढे महत्त्व असतानाही चौकात आजही लोखंडी अँगलवर फ्लेक्स लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र प्रदर्शित केले जात आहे. ही बाब चौकाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्वाला साजेशी नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे नगरसेवक केतन विकास ठाकरे यांनी आपल्या नगरसेवक निधीतून या चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ‘म्युरल वॉल आर्ट’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच चौकाचे सुशोभीकरण, आकर्षक प्रकाशयोजना, हरितीकरण आणि आवश्यक नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तात्पुरत्या फ्लेक्सऐवजी कायमस्वरूपी स्मारकात्मक सौंदर्यीकरण व्हावे, ही नागरिकांची प्रमुख अपेक्षा असून, नगरसेवक केतन ठाकरे या मागणीला कितपत सकारात्मक प्रतिसाद देतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते पंकज थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनावर पत्रकार संतोष तायडे, सोनू मंडपे, दिलीप बेलिया,अभिषेक शेळके, शशांक कांबळे, गणेश बागडे, अमित झाडे, योगेश, शुभम तेलरांधे, राजेश बागेश्वर, हंसराज उफाडे, प्रदीप शंभरकर, स्नेहल बागडे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक















