बेसात शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ गडद! घटनास्थळी दारूच्या दोन बाटल्या, ग्लास अन् कोल्डड्रिंकची बॉटल; आधी कोणाचा गळफास?

– दोन महिन्यांपूर्वीच केला होता आंतरधर्मीय प्रेमविवाह; एकाच पंख्याला स्वतंत्र ओढण्यांनी घेतला गळफास, मृत्यूच्या घटनाक्रमाबाबत पोलिसांकडून तपास

The Exposer
नागपूर : दिवाळीच्या पहाटे बेसा येथील रेवतीनगर परिसरात शिक्षक दाम्पत्याचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मनीष प्रल्हाद गणवीर (३८) आणि त्यांची पत्नी सोनाली (३५) यांच्या मृत्यूमागील गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळी दारूच्या दोन बाटल्या, ग्लास आणि कोल्डड्रिंकची बॉटल आढळल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे घटनेपूर्वी नेमके काय घडले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

घटनास्थळी दारूच्या बाटल्या; नेमके काय घडले?

बेलतरोडी पोलिसांना घटनास्थळाच्या पाहणीत दारूच्या दोन बाटल्या, ग्लास आणि कोल्डड्रिंकची बॉटल आढळल्याची माहिती आहे. या वस्तूंचा घटनेशी काही संबंध आहे का, त्यांचा वापर कोणी केला होता आणि घटनेपूर्वी घरात नेमके काय घडले, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आधी मनीष यांनी गळफास घेतला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर सोनाली यांनीही टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता तपासाच्या अनुषंगाने चर्चेत आहे. मात्र, मृत्यूचा नेमका घटनाक्रम अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेला नाही.

दोन महिन्यांपूर्वीच थाटला होता संसार

मनीष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील एका खासगी कंपनीद्वारे संचालित शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते. पहिला संसार मोडल्यानंतर एकत्र काम करताना त्यांची ओळख झाली आणि पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. कुटुंबीयांच्या संमतीने ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांनी आंतरधर्मीय विवाह केला होता.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या दाम्पत्याचा दिवाळीच्या दिवशी असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नातेवाइकाला गॅलरीतून दिसले भयावह दृश्य

दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त दोघेही गडचिरोलीहून नागपूरला आले होते. घटनेच्या वेळी मनीषच्या कुटुंबातील अन्य सदस्य बौद्धगया येथे गेले होते. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीयांनी जयताळा येथील एकात्मतानगर परिसरात राहणारे नातेवाईक प्रशिक्ष अजय लांडगे (२६) यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

घरी पोहोचल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी टीनशेडवर चढून गॅलरीतून घरात डोकावले. त्यावेळी दोघांचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर तातडीने नातेवाइकांसह पोलिसांना माहिती देण्यात आली.

सुसाइड नोट नाही; ओरखड्यांच्या खुणाही तपासाच्या केंद्रस्थानी

घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही. मृतदेहांवर किरकोळ ओरखड्यांच्या खुणा असल्याची माहितीही समोर आली आहे. घटनेपूर्वी दाम्पत्यामध्ये वाद झाला होता का, ओरखड्यांचे नेमके कारण काय आणि मृत्यूचा घटनाक्रम कोणता, या बाबींचा तपास होणे आवश्यक आहे. दाम्पत्याच्या बहिणींनी कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित असल्याचे सांगत घटनेमागील कारणाबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरित; पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

दोन महिन्यांपूर्वी झालेला प्रेमविवाह, दिवाळीच्या दिवशी घडलेली घटना, घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या आणि ग्लास, मृतदेहांवरील ओरखड्यांच्या खुणा तसेच आधी कोणाचा मृत्यू झाला, याबाबत व्यक्त होणारा अंदाज… या सर्व बाबींचा परस्पर संबंध तपासातून स्पष्ट होणे गरजेचे आहे. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक तपासातूनच या दुर्दैवी घटनेमागील सत्य समोर येणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More