– बेलतरोडी पोलिसांची मध्यरात्री छापेमारी; एक लाखांचा मुद्देमाल जप्त, कारवाईतील ‘अर्थपूर्ण’ घडामोडींचीही चर्चा
The Exposer
नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात बेलतरोडी पोलिसांनी मोठी कारवाई करत खापरी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेला एमडी ड्रग्जचा सौदा उधळून लावला. भारत पेट्रोल पंपासमोरील या हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी चार जणांना अटक केली. आरोपींकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची १८ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली.
बेलतरोडीचे ठाणेदार रवींद्र नाईकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खापरी परिसरातील हॉटेलमध्ये चौघे एमडी पावडरची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत भूषण रमेश फुलसुंगे (चिंचभवन), नितेश सुभाष शाहू (दहेगाव रंगारी), सौरव सतीश लष्करे (वर्धा रोड) आणि मोहित गजानन भाजीपाले (डोंगरगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान त्यांच्याकडून १८ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.
कारवाईभोवती संशयाचे सावट; ‘सेटिंग’च्या चर्चेने खळबळ!
या कारवाईनंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यातील अंतर्गत घडामोडींचीही चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या चर्चेनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र, ठाणेदारांच्या निदर्शनास येण्यापूर्वीच आरोपींना वाचविण्यासाठी कथित ‘अर्थपूर्ण तडजोडी’चे प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर प्रकरणात अधिकृत कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, या चर्चांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Author: संतोष तायडे
संपादक















