– पेंच अभयारण्य परिसरातील दुर्घटना, यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
The Exposer
नागपूर : मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताने नागपूरसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत झिदान (rehan) अली नावाचा तरुण जागीच ठार झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात सहभागी असलेली कार भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या मालकीची असल्याचे समोर आल्याने प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. आमदारांचा मुलगा यथार्थ फुके याचाही या अपघाताशी संबंध असल्याची चर्चा असून तो जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील कुरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघाताची दुर्घटना घडली. अपघातग्रस्त कारचा नोंदणी क्रमांक MH40 AH 7227 हा आहे. ही कार आमदार परिणय फुके यांच्या मालकीची आहे. यासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस पार्टीने समाजमाध्यमाद्वारे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. हीच मागणी शिवसेना नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी सुद्धा केली आहे.
परिणय फुके यांचे स्पष्टीकरण; मुलगा गाडी चालवत नसल्याचा दावा
दरम्यान, या आरोपांवर आमदार परिणय फुके यांनी प्रसारमाध्यमाकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अपघातग्रस्त वाहन आपल्या मालकीचे असल्याचे मान्य केले. मात्र, अपघाताच्या वेळी आपला मुलगा यथार्थ फुके वाहन चालवत नव्हता, असा दावा त्यांनी केला. मुले दोन वेगवेगळ्या वाहनांतून गेली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी करावी, अशी भूमिकाही परिणय फुके यांनी मांडली आहे.
आता पोलिसांच्या तपासाकडे लक्ष!
आमदारांच्या मालकीची कार असल्याने या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असले, तरी तपासाचा केंद्रबिंदू एका तरुणाचा मृत्यू आणि जखमींना न्याय मिळणे हाच असायला हवा. कायद्यापुढे सर्व समान असल्याने कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्ष तपास होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















