झिदान अलीचा बळी; आमदाराच्या कारचे स्टेअरिंग कुणाच्या हाती होते? चालकाला कुणाचे अभय?

– मृतक अल्पवयीन असल्याची शक्यता; चालकावर गुन्हा दाखल झाला का? मध्य प्रदेश पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष!

The Exposer
नागपूर : मध्यप्रदेशातील पेंच अभयारण्य परिसरात झालेल्या भीषण कार अपघातात झिदान (रेहान) अली या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघातग्रस्त कार भाजप आमदार परिणय फुके यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कारचे स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती होते? निष्काळजीपणे भरधाव वाहन चालविणाऱ्या चालकाची चौकशी झाली का? त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला का? की या प्रकरणात चालकाला कुणाचे अभय मिळत आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक झिदान अली हा नागपुरातील गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. तो अल्पवयीन असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. कुटुंबात एक मोठा भाऊ तसेच आजी-आजोबा आहेत. त्याचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक असल्याचे सांगितले जाते. एका कुटुंबातील तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप आहे. अपघातात झिदान अली याने सीट बेल्ट लावला नव्हता, असे आमदार परिणय फुके यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. मात्र, सीट बेल्ट न लावण्याची बाब आणि अपघातास कारणीभूत ठरलेली परिस्थिती या दोन स्वतंत्र बाबी असून, त्यांची तपासातून पडताळणी होणे आवश्यक आहे. पोलिसांचा तपास अहवाल समोर येण्यापूर्वीच कार मालकाने सीट बेल्ट हे झिनादच्या मृत्यूसाठी कारण ठरल्याचे म्हणणे कितपत योग्य आहे, अशी चर्चा रंगली आहे.

कारचे स्टेअरिंग नेमके कुणाच्या हाती होते?

आमदार फुके यांनी अपघातग्रस्त कार आपल्या मालकीची असल्याचे मान्य करताना स्वतंत्र चालक वाहन चालवत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, हा चालक नेमका कोण होता? अपघाताच्या वेळी तोच वाहन चालवत होता का? त्याच्याकडे वैध वाहन परवाना होता का? वाहनाचा वेग किती होता? अपघातापूर्वी चालकाने मद्यप्राशन केले होते का? या सर्व बाबींची मध्य प्रदेश पोलिसांनी चौकशी केली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चालकावर कारवाई झाली का?

अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून अन्य पाच जण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत प्रत्यक्ष वाहन चालविणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. पोलिसांनी चालकाचा जबाब नोंदविला का? तो अल्पवयीन की वयस्क? त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला का? कार मालकाची चौकशी झाली का? वाहनाची तांत्रिक तपासणी करण्यात आली का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.

मृतक झिदान अली अल्पवयीन असल्याची शक्यता लक्षात घेता अपघाताच्या वेळी वाहनातील प्रवाशांचे वय, त्यांची सुरक्षितता आणि वाहन चालविण्याची जबाबदारी यांचीही सखोल तपासणी आवश्यक आहे.

मध्य प्रदेश पोलिसांच्या तपासाकडे लक्ष!

या अपघाताला राजकीय वळण मिळाले असले तरी तपासात कोणताही राजकीय दबाव किंवा प्रभाव असता कामा नये. कार कोण चालवत होते, अपघात कशामुळे झाला, चालकाची चूक होती का आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली का, कारमध्ये एकूण किती जण बसले होते, यात किरकोळ व गंभीर जखमीची संख्या किती, या प्रश्नांची उत्तरे मध्य प्रदेश पोलिसांनी अधिकृतपणे समोर आणणे गरजेचे आहे.

एकीकडे झिदान अलीच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दुसरीकडे अपघाताच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मृत्यू एका तरुणाचा झाला, पण कारचे स्टेअरिंग कुणाच्या हाती होते आणि त्या चालकावर कारवाई झाली का, याचा खुलासा कधी होणार? आता सर्वांचे लक्ष मध्य प्रदेश पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More