गुजरातच्या गीर अन् हरियाणाच्या साहीवाल गाईंचे नागपुरात प्रजनन; विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसायाचा नवा मार्ग!

– दिवसाला १६ लिटर दूध देण्याची क्षमता; प्रजननक्षम आयुष्यात ९ ते १० वासरांना जन्म देण्याची क्षमता

The Exposer
नागपूर : शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नाला नवी दिशा मिळू शकते. याच विचारातून नागपुरातील बेलतरोडी, विठ्ठल लॉन परिसरात गुजरातची प्रसिद्ध गीर आणि हरियाणाची नामांकित साहीवाल या देशी दुधाळ गोवंशांच्या प्रजननाचा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे. दिवसाला सुमारे १६ लिटर दूध देण्याची क्षमता, दुधातील पोषणमूल्ये आणि योग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन मिळविण्याची क्षमता ही या गाईंची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायाची जोड देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा ध्यास केशव ब्रिडींग फार्मचे संचालक केशव थुल यांनी घेतला आहे.

शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता दुग्धव्यवसायातून नियमित उत्पन्न मिळवावे, आर्थिक स्थैर्य निर्माण व्हावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी दुग्धव्यवसाय प्रभावी जोडधंदा ठरू शकतो, असा विश्वास थुल व्यक्त करतात.

२०१२ मध्ये एका गीर वासरापासून सुरुवात

केशव थुल यांनी २०१२ मध्ये बेलतरोडी, विठ्ठल लॉन परिसरात केशव ब्रिडींग फार्मची स्थापना केली. सुरुवातीला छोटेखानी शेड उभारून गुजरातमधील भावनगर-जुनागड परिसरातून ५० हजार रुपये किमतीचे एक वर्षाचे गीर जातीचे वासरू खरेदी केले. त्याचे संगोपन करून प्रजननाची प्रक्रिया सुरू केली. आज या गाईचे एक वासरू सावनेर येथील शेतकऱ्याकडे आहे.

एका गीर वासरापासून सुरू झालेला हा प्रवास आज देशी गोवंश संवर्धनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सध्या फार्ममध्ये गीर आणि साहीवाल जातींच्या गाई, वासरे, कालवडी आणि बैल मिळून एकूण सात गोवंश आहेत.

१ लाख ३५ हजारांची साहीवाल गाय; कृषी प्रदर्शनात पटकावला द्वितीय क्रमांक

केशव ब्रिडींग फार्मचे विशेष आकर्षण म्हणजे हरियाणातील कर्नाल येथील साहीवाल जातीची दुधाळ गाय. या गाईने कृषी प्रदर्शनात दुधाळ गाईंच्या श्रेणीत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. तिची दूध देण्याची क्षमता आणि प्रजननासाठी असलेली उपयुक्तता लक्षात घेऊन केशव थुल यांनी ही गाय गुजरातमधील जुनागड येथून तब्बल १ लाख ३५ हजार रुपये मोजून खरेदी केली. तिच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त ४० हजार रुपये खर्च आला.

प्रजननासाठी उच्च दर्जाच्या साहीवाल गोवंशाची निवड करण्याच्या दृष्टीने ही खरेदी महत्त्वपूर्ण मानली जाते. सध्या गीर गाईच्या वासराची किंमत ६० ते ७० हजार रुपये, तर साहीवाल गाईच्या वासराची किंमत सुमारे १ लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती थुल यांनी दिली.

गीरसोबत साहीवाल प्रजातीचेही प्रजनन

गुजरातच्या गीर गाईंसोबतच हरियाणाच्या साहीवाल प्रजातीच्या गाई आणि वळूंचेही फार्ममध्ये संगोपन केले जात आहे. योग्य प्रजनन आणि निवडक गोवंश संवर्धनातून अधिक दूध देण्याची क्षमता असलेल्या सुदृढ वासरांची पैदास करणे, हे थुल यांचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, फार्ममधील गाईंचे दूध बाजारात विकण्याऐवजी वासरांच्या पोषणासाठी वापरण्यावर भर दिला जातो. त्यामुळे वासरांची योग्य वाढ आणि सुदृढ संगोपन करण्यास मदत होते.

दिवसाला १६ लिटर दूध; प्रथिनांचे प्रमाणही महत्त्वाचे

गीर आणि साहीवाल प्रजातींच्या गाईंची दूध देण्याची क्षमता हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. फार्ममधील माहितीनुसार, एका गाईकडून सकाळी सुमारे ८ लिटर आणि सायंकाळी ८ लिटर असे मिळून दिवसाला एकूण १६ लिटर दूध मिळू शकते. दुधातील प्रथिने आणि इतर पोषणमूल्यांमुळेही या देशी गोवंशाच्या दुधाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. स्थानिक देशी गाईंच्या तुलनेत या प्रजातींकडून अधिक दूध उत्पादन मिळू शकते, असे थुल यांनी सांगितले.

१५ वर्षांत ९ ते १० वासरांना जन्म देण्याची क्षमता

योग्य आहार, आरोग्याची काळजी आणि प्रजनन व्यवस्थापन केल्यास एका गाईच्या प्रजननक्षम आयुष्यात सुमारे ९ ते १० वासरे मिळू शकतात, अशी माहिती थुल यांनी दिली. त्यामुळे दूध उत्पादनासोबतच उत्तम वंशावळीच्या वासरांचे संगोपन आणि विक्रीतूनही शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध होऊ शकतो.

दिवसाला ६५ ते ७५ रुपयांचा चारा खर्च!

या गाईंच्या संगोपनासाठी दिवसाला एका गाईमागे साधारण ६५ ते ७५ रुपये खर्च येत असल्याचा दावा थुल यांनी केला आहे. त्यांच्या आहारात सायलेज ग्रास, कॉटन ढेप, जवस ढेप, मिनरल मिक्स्चर आणि चणा कुटार यांचा समावेश असतो.

योग्य आहाराचे नियोजन आणि नियमित देखभाल केल्यास दूध उत्पादनाच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळू शकतात, असा त्यांचा अनुभव आहे. मात्र, प्रत्यक्ष खर्च हा चाऱ्याची उपलब्धता, दूध उत्पादन, पशुवैद्यकीय सेवा आणि संगोपन पद्धतीनुसार बदलू शकतो.

किंमतीत मोठी तफावत; शेतकऱ्यांसाठी नवा पर्याय

स्थानिक देशी गाईंची किंमत साधारण ४० ते ४५ हजार रुपये असताना गीर आणि साहीवाल प्रजातींच्या गाईंची किंमत लाखाच्या पुढे जाते. दूध उत्पादनाची क्षमता, वंशावळ आणि प्रजननासाठी असलेले महत्त्व यामुळे या गाईंना अधिक किंमत मिळते. या गाईंचा स्वभाव तुलनेने शांत असल्याने त्यांचे संगोपन करणेही सोयीचे ठरते, असे थुल सांगतात.

A१ की A२ दूध? देशी गाईंच्या दुधाची वाढती मागणी

दूध हे शरीराला आवश्यक असलेल्या प्रथिने, कॅल्शियम आणि विविध पोषक घटकांचा महत्त्वपूर्ण स्रोत आहे. A१ आणि A२ दुधातील प्रमुख फरक हा त्यामध्ये असलेल्या बीटा-कॅसिन या प्रथिनाच्या प्रकारात आहे. काही जर्सी आणि होलस्टीन फ्रिजियन गाईंच्या दुधात A१ प्रकारचे बीटा-कॅसिन आढळते, तर गीर, साहीवाल आणि लाल सिंधी यांसारख्या देशी गाईंच्या दुधात A२ प्रकारचे बीटा-कॅसिन आढळण्याचे प्रमाण अधिक असते.

A१ दुधाच्या पचनादरम्यान BCM-७ नावाचे पेप्टाइड तयार होऊ शकते. A२ दुधात बीटा-कॅसिनच्या रचनेमुळे ही प्रक्रिया वेगळी असते. त्यामुळे A२ दूध पचनास अधिक सोपे आणि पोषक असल्याचा दावा केला जातो. परदेशातही A२ दुधाबाबत जागरूकता वाढत असून भारतात मात्र A१ आणि A२ दुधातील फरक, त्यांचे गुणधर्म आणि शुद्ध देशी गायींचे संवर्धन याबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. देशी गायींचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन आणि दुग्धव्यवसायाला प्रोत्साहन मिळाल्यास शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात, असे केशव थुल यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा ध्यास

शेतीला दुग्धव्यवसायाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नियमित अतिरिक्त स्रोत उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी योग्य गोवंशाची निवड, चाऱ्याचे नियोजन, पशुवैद्यकीय देखभाल आणि बाजारपेठेचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. विदर्भाच्या वातावरणात अनुकूल ठरणाऱ्या गीर आणि साहीवालसारख्या देशी दुधाळ गोवंशाचे संवर्धन करून त्यांची पैदास शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा केशव थुल यांचा प्रयत्न आहे.

२०१२ मध्ये एका गीर वासरापासून सुरू झालेला केशव ब्रिडींग फार्मचा प्रवास आज गुजरातच्या गीरपासून हरियाणाच्या साहीवालपर्यंत पोहोचला आहे. कृषी प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या साहीवाल गाईसाठी १ लाख ३५ हजार रुपये मोजण्यापासून ते देशी गोवंशाच्या प्रजननापर्यंतचा हा प्रवास केवळ फार्मपुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नाचे उदाहरण ठरत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More