– शासकीय कामासाठी नागरिकाकडे पैशांचा तगादा; पंचांसमक्ष लाच स्वीकारताच कारवाई
The Exposer
नागपूर : महापालिकेतील काम करून घेण्यासाठी नागरिकांना लाचेची रक्कम मोजावी लागते का, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना नागपुरात उघडकीस आली आहे. घराच्या जमाबंदी अभिलेखाची माहिती मिळवून देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची मागणी करणाऱ्या नागपूर महापालिकेच्या कर संग्राहकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडले. गौरव राजू वानखेडे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या घराचा जमाबंदी अभिलेख मिळविण्यासाठी त्यांनी नियमानुसार अर्ज केला होता. मात्र, संबंधित अभिलेखाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी कर संग्राहक गौरव वानखेडे याने एक हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. शासकीय कामासाठी अवैध रक्कम देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले.
१२ नोव्हेंबर रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी सुरू केली. पंचांच्या उपस्थितीत आणि ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पडताळणीत वानखेडे याने जमाबंदी अभिलेखाची माहिती देण्यासाठी एक हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतरही त्याने एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
त्यानंतर एसीबीने गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पंचांसमक्ष एक हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने वानखेडेला रंगेहात पकडले. अवघ्या हजार रुपयांच्या लाचप्रकरणी महापालिकेतील कर्मचाऱ्याला एसीबीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील सुधारित कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, पोलीस कर्मचारी भरत ठाकूर, आशीष वैद्य, मिलिंद मेश्राम, प्रफुल्ल भातकुलकर आणि संकेत रामटेके यांचा समावेश होता.
Author: संतोष तायडे
संपादक















