– सख्ख्या नात्याला काळिमा; मेहुण्यानेच घेतला दाजीचा जीव? चिंटू उर्फ आयुष धुपेवर संशयाची सुई
– मेडिकल चौकात रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास घडली थरारक घटना
The Exposer
नागपूर : नागपूरच्या गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात गुरुवारी रात्री रक्तरंजित थरार घडला. मेडिकल चौकातून तुकडोजी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर ठेल्यांसमोरच एका हिस्ट्रीशीटरची निर्घृण हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार केल्यानंतर सिमेंटच्या कुंड्याने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पलाश ऊर्फ गनी प्रकाश वासनिक (वय ३२, रा. रामबाग) असे मृताचे नाव आहे.
या हत्येमागे चिंटू ऊर्फ आयुष धुपे आणि त्याच्या एका साथीदाराचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, चिंटू हा मृत पलाशचा नात्याने मेहुणा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक नात्यातूनच हा रक्तरंजित संघर्ष उभा राहिला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गजबजलेल्या चौकात हत्याकांड; पोलिसांची धावपळ!
गुरुवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास ही घटना घडली. मेडिकल चौक ते तुकडोजी चौक मार्गावरील वर्दळीच्या ठिकाणी अचानक हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अजनी, इमामवाडा आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्यांची पथके घटनास्थळी दाखल झाली. गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल, सहायक पोलीस आयुक्त आणि परिक्षेत्रीय विशेष पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर परिसरातील काही हातगाडीधारकांनी आपापले ठेले बंद करून तेथून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला.
कौटुंबिक वादातून हत्या? कारण अद्याप गुलदस्त्यात!
प्राथमिक माहितीनुसार, पलाश हा रामबाग येथून मेडिकल चौक परिसरात आला असताना संशयितांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पलाशचा मृत्यू झाला. हत्येमागे काही काळापासून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयित आरोपींची भूमिका, हत्येपूर्वी झालेला वाद आणि या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
कोण होता पलाश ऊर्फ गनी वासनिक?
पलाश ऊर्फ गनी प्रकाश वासनिक हा इमामवाडा आणि रामबाग परिसरातील सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. त्याच्याविरुद्ध लूटमार, दरोडा, जबरदस्तीने वसुली, जाळपोळ तसेच कथित मानवी तस्करी आणि बनावट पासपोर्ट रॅकेटसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती आहे.
२०२३ मध्ये नागपूर एटीएसने बनावट पासपोर्ट आणि अवैध स्थलांतराशी संबंधित कथित रॅकेटप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यानंतर २०२६ मध्ये भोपाळ एसटीएफ आणि इतर तपास यंत्रणांकडून २५० हून अधिक बनावट पासपोर्ट प्रकरणाच्या अनुषंगाने त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली होती. नागपुरातून फरार होऊन पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामार्गे बांगलादेशात पळून गेल्याची शक्यताही त्यावेळी चर्चेत होती.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह!
दरम्यान, याच दिवशी एका राष्ट्रीय खेळाडूच्या मृत्यूच्या प्रकरणात संबंधित दुचाकीस्वाराला केवळ सूचना पत्र देऊन सोडल्याच्या आरोपावरून पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही तासांतच मेडिकल चौकात हिस्ट्रीशीटरची हत्या झाल्याने दक्षिण नागपुरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता या हत्येचा तपास कोणत्या दिशेने जातो, संशयितांना कधी अटक होते आणि हत्येमागील नेमके कारण काय, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















