दुचाकी चोरांचा पर्दाफाश! चार वाहने चोरणारा आरोपी जेरबंद; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

– तहसील, बेलतरोडी आणि कामठी परिसरातील वाहनचोरींची उकल; गुन्हे शाखेच्या तपासात आरोपीची कबुली

The Exposer
नागपूर : नागपूर शहरात दुचाकी चोरी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत वाहनचोराला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केलेली चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, या कारवाईत एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तहसील, बेलतरोडी आणि कामठी परिसरातील वाहनचोरीचे गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख सोहेल ऊर्फ मोनू बाबा ऊर्फ शाहरुख वल्द शेख खालिद (वय ३८, रा. जुनी कामठी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पार्किंगमधून गायब केली अ‍ॅक्टिव्हा

या प्रकरणातील फिर्यादी हेमंत राजेंद्रप्रसाद गुप्ता (वय ५०) यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपली काळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा मंदिराजवळील पिल्लू पांडे पंच कमिटी चाळ परिसरात घरासमोरील पार्किंगमध्ये लॉक करून ठेवली होती. मात्र, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वाहन चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही वाहन न मिळाल्याने त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीत चार वाहनचोरींची कबुली

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी शेख सोहेल याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने तहसील, बेलतरोडी आणि कामठी परिसरातून एकूण चार दुचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन अ‍ॅक्टिव्हा मोपेड, यामाहा कंपनीची एक मोटारसायकल आणि आणखी एक अ‍ॅक्टिव्हा मोपेड अशी चार वाहने जप्त केली. या वाहनांची एकूण किंमत १ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) विनिता साहू, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीलसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, पोलीस निरीक्षक सतीश फरकाडे तसेच पोलीस कर्मचारी संजय साहू, संदीप गवळी, फिरोज खान, वैभव कुलसंगे, संदीप सिरफुले आणि हंसराज पाउलझगडे यांनी सहभाग घेतला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More