– गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ची तहसील हद्दीत छापेमारी; ७८ चकरी नायलॉन मांजा जप्त, गोंदियातील मनोज रेड्डीचा शोध सुरू
The Exposer
नागपूर : नायलॉन मांजाच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी असतानाही शहरात त्याची अवैध विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक २ ने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापेमारी करून प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ७८ चकरी जप्त केल्या असून, त्यांची किंमत तब्बल १ लाख २८ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.१० वाजताच्या दरम्यान अन्सार नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पंच आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी फैजान अख्तर (वय ३०, रा. अन्सार नगर, मोमीनपुरा, नागपूर) याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या ७८ चकरी जप्त केल्या. या प्रकरणात गोंदिया येथील मनोज कुमार रेड्डी याचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५ व १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपीला तहसील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक















