हायकोर्टाचा आदेश असतानाही डॉ. आंबेडकर कॉलेजला कुलूप; महिला प्राचार्य डॉ. मेहरे यांच्यावर अन्याय कोणाचा?

– कायमस्वरूपी प्राचार्यपदाचा दावा; कक्षात बसण्यास मज्जाव, सरकारी कामकाजात अडथळा; महिला आयोग दखल घेणार का?

The Exposer
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ असतानाही डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आल्याचा आणि प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी मेहरे यांना त्यांच्या अधिकृत कक्षात बसण्यास मज्जाव करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालयातील प्रशासकीय वाद पुन्हा ऐरणीवर आला असून, एका महिला प्राचार्यांनाच त्यांच्या पदाचे अधिकार बजावण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप होत आहे.

नियुक्तीची तारीख आणि सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या निकषांवर डॉ. मेहरे या कायमस्वरूपी प्राचार्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असताना त्यांना कक्षात बसण्यापासून रोखण्यामागचे नेमके कारण काय? त्यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये हस्तक्षेप कोण करीत आहे? आणि हा प्रकार कोणाच्या निर्देशावरून घडत आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ असतानाही महाविद्यालयाला कुलूप लावण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा सवालही उपस्थित झाला आहे. महाविद्यालयाच्या नियमित कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याच्या आरोपांवर पोलीस प्रशासन आणि उच्च शिक्षण विभागाने अद्याप कोणती भूमिका घेतली, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

या प्रकरणाला महिला सन्मानाचा पैलूही जोडला गेला आहे. एका महिला प्राचार्यांना त्यांच्या पदानुसार काम करता येत नसेल, तर केंद्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग या प्रकरणाची दखल घेणार का? त्यांच्या सेवाविषयक अधिकारांची आणि कार्यस्थळावरील परिस्थितीची चौकशी होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाविद्यालयातील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर होण्याची शक्यता लक्षात घेता, व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि उच्च शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हायकोर्टाचा आदेश, सेवाज्येष्ठतेचा दावा आणि महिला प्राचार्यांच्या अधिकारांचा प्रश्न; दीक्षाभूमी व डॉ. आंबेडकर कॉलेजची बदनामी होत असतांना प्रशासन गप्प का? डॉ. मेहरे यांना न्याय मिळणार का, याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More