– जीवनमृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली; पोलीस मित्रांकडूनही करण्यात आली होती आर्थिक मदत
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील दोन कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाल्याने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. विनोद यादव (वय ४८) आणि शैलेश गनोरकर (वय ४०) अशी निधन झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.
विनोद यादव हे कामठी पोलीस ठाण्यात, तर शैलेश गनोरकर हे पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दोघांवरही उपचार सुरू होते. आजाराशी सुरू असलेल्या या कठीण संघर्षात त्यांना आर्थिक मदतीचीही आवश्यकता भासली होती. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलातील सहकारी आणि मित्रांनी पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला होता. प्रशासनाकडूनही शक्य ते सहकार्य करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच दोघांचीही प्राणज्योत मालवली.
विनोद यादव यांच्यावर सोमवारी मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शैलेश गनोरकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अल्पावधीत दोन सहकाऱ्यांना गमावल्याने त्यांच्या पोलीस मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलाने दोन सहकारी गमावले असून, त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















