– २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान विशेष मोहीम; कारवाईत अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून पोलीस विभागाकडे धाव
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील मोकाट डुकरांचा वाढता उपद्रव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नागरिकांच्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र, मोकाट डुकरांना पकडण्याच्या कारवाईदरम्यान संबंधितांकडून विरोध होऊन अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिकेने आता थेट नागपूर पोलीस विभागाकडे मदतीची मागणी केली आहे. या मोहिमेसाठी पोलीस अधिकाऱ्यासह किमान १५ पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा संचालक राजेश भगत यांनी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस उपायुक्त, विशेष शाखा यांना पत्र पाठवून बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानंतर पोलीस उपायुक्त, विशेष शाखा डॉ. संदीप पखाले यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
महानगरपालिकेच्या पत्रानुसार, शहरातील मोकाट डुकरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होणे, नागरिकांच्या घरांमध्ये घुसून त्रास देणे तसेच त्यांच्या वावरामुळे घाण व दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणे, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत मोकाट डुकरे पकडण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी तामिळनाडू येथील प्रशिक्षित पथकाला बोलाविण्यात आले आहे. यापूर्वी मोकाट डुकरे पकडण्याची कारवाई करताना संबंधित मालकांकडून विरोध होऊन अडथळे निर्माण झाल्याने महानगरपालिकेला अपेक्षित कारवाई करता आली नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी प्रशिक्षित पथकासोबत पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशननिहाय नव्हे, केंद्रीय बंदोबस्ताची मागणी!
विशेष म्हणजे, यापूर्वी मोकाट डुकरे पकडल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीतच कारवाई करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे यावेळी पोलीस स्टेशननिहाय बंदोबस्ताऐवजी केंद्रीय पद्धतीने बंदोबस्त उपलब्ध करून दिल्यास शहरातील कोणत्याही परिसरात अचानक कारवाई करणे शक्य होईल, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दहा दिवसांच्या कालावधीत पोलीस अधिकाऱ्यासह किमान १५ पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांची मदत महत्त्वाची असल्याचे पत्रात नमूद आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत कळवून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता पोलिसांच्या बंदोबस्तात मोकाट डुकरांविरोधात मोहीम राबविण्याची तयारी महानगरपालिकेने केली आहे. मात्र, प्रत्यक्षात किती पोलीस कर्मचारी उपलब्ध होतात आणि दहा दिवसांच्या या मोहिमेत शहरातील मोकाट डुकरांच्या समस्येवर कितपत नियंत्रण मिळते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















