
The Exposer
नागपूर : बिनाकी लेआऊट परिसरातील प्लॉट क्रमांक ६३९ संदर्भातील मालकी व ताब्याच्या वादातून आपल्याला २५ लाख रुपयांच्या खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप करीत अनुसूचित जातीतील पीडित नागरिक अनिल ताराचंद सहारे यांनी यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशा प्रकारे वादग्रस्त प्लॉट प्रकरणात मोठा टिवस्ट आला आहॆ.
त्यामुळे गंभीर अशा या संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून गुन्हे शाखा पोलिसांकडे खोटी तक्रार करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच स्वतः व कुटुंबास पोलिस संरक्षण देण्याची मागणी पीडित सहारे यांनी केली आहे. तक्रारीनुसार, प्लॉट क्रमांक ६३९ बाबत दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असून मालकी हक्काचा प्रश्न अद्याप न्यायप्रविष्ट आहे. असे असताना स्वतःला वकील सांगणाऱ्या व इतर काही व्यक्तींनी दबाव टाकून प्लॉट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्लॉट वर मालकी हक्काचा दावा करणारे मनिष हिरालाल सुगंध रा. पुराना बगडगंज, टेलिफोन एक्सचेंज चौक, नागपूर व स्वतःला वकील सांगणारा अनोळखी व्यक्ती असे गैर अर्जदारांची नाव आहॆ.
तक्रारदार अनिल सहारे रा. इंदिरामाता नगर, बिनाकी लेआऊट, नागपूर यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आपण संबंधित परिसरात नसतानाही प्लॉटवर जाऊन मारहाण व २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. मात्र त्या काळात आपण आठवडा भरापासून मुंबई येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभात उपस्थित होतो. याबाबत विवाहपत्रिका व छायाचित्रांसह व्हिडीओ पुरावा उपलब्ध असल्याचा दावा सहारे यांनी केला आहे. तसेच, इतक्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारीची चौकशी स्थानिक पोलिस ठाण्याऐवजी थेट गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तत्पूर्वी गैर अर्जदाराने केलेली तक्रारीची पडताळणी सुध्दा करण्यात आली नाही. अशा प्रकारे मला खोट्या गुन्हात कारागृहात टाकण्याची योजना होती. यासाठी संबंधित व्यक्तींनी प्रभाव, दबाव व संगनमताच्या आधारे खोटे प्रकरण तयार केल्याचा आरोप तक्रारीत करून सहारे यांनी पोलिस प्रशासनाकडे संबंधित व्यक्तींचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), लोकेशन तपासण्याची, खोटी तक्रार करून बदनामी व मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारदाराने आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त करत, भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणीही पोलिसांकडे केली आहे. सध्या या तक्रारीमुळे प्लॉट वाद आणि कथित खंडणी प्रकरणाची चर्चा परिसरात रंगली असून, यशोधरा नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासकामी यशोधरा नगर पोलिस मुंबईला जाणार असून येथील सभागृह मालक, व्हिडीओ शूटिंग करणार, फोटोग्राफर, वर,-वधू व लग्नातील काही नातेवाईकांची सुध्दा चौकशी करणार असल्याचे बोलले जातं आहॆ.
दुसरीकडे, याच 25 लाखाच्या खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांची विभागीय चौकशी सुरू आहॆ. कळमना विभागाचे एसीपी रोहित ओव्हाळ हे चौकशी करीत असून सदर प्रकरण पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी गंभीरतेने घेतले आहॆ, हे विशेष.
Author: संतोष तायडे
संपादक











