आंतरराज्यीय अफिम तस्करीवर नागपूर ग्रामीण पोलिसांचा मोठा प्रहार!

– झारखंडमधून २.२८५ किलो अफिम जप्त; १३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त 

The Exposer
नागपूर : अंमली पदार्थ तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत आंतरराज्यीय अफिम तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यात छापा टाकून पोलिसांनी २ किलो २८५ ग्रॅम अफिम, लॅपटॉप, मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यासह १३ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमरेड पोलिस ठाण्यात २० मे २०२६ रोजी दाखल झालेल्या अफिम तस्करीच्या गुन्ह्याचा तपास करताना नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने या आंतरराज्यीय जाळ्याचा छडा लावला. तपासादरम्यान झारखंडमधील सिमडेगा येथे छापा टाकून हॉटेल व्यावसायिक मनीषकुमार अंबिकाप्रसाद (४६) याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून ३३.७६७ किलो अफिम, २३.३५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि इतर साहित्य असा तब्बल १ कोटी ९२ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
या कारवाईनंतर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने आरोपीची कसून चौकशी केली. चौकशीतून खूंटी जिल्ह्यातील विमलसिंह मुंडा हा या रॅकेटचा प्रमुख पुरवठादार असल्याचे समोर आले.
पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुंडू शहरातील त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. घराची झडती घेताना पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात अफिम लागली.
३ जून रोजी झालेल्या या कारवाईत २ किलो २८५ ग्रॅम अफिम (किंमत ११.४२ लाख रुपये), एक लॅपटॉप, दोन मोबाईल हँडसेट आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीतील इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली असून नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More