– हिंगणा नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

The Exposer
नागपूर : हिंगणा नगरपंचायतीकडून ०४ जून २०२६ रोजी नाला खोलीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठिकाणी पाणीपुरवठा अभियंता मनीष राठोड उपस्थित नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोकलेन मशीनच्या साहाय्याने नाला सफाई सुरू असताना शिवकुमार चंदेल यांच्या शेतजमिनी शेजारील पिण्याच्या पाण्याची विहीर तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या असलेल्या समाधीचे सुध्दा नुकसान केल्याची घटना गुरुवारी घडली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणण्यात आली. त्यानंतर मशीन मालकामार्फत विहीर पूर्ववत बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे शिवकुमार चंदेल यांनी सांगितले. तसेच विहिरीचे पूर्ण पुनर्बांधकाम करून न दिल्यास पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेमुळे नगरपंचायतीच्या विकासकामांवरील देखरेख, अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि जबाबदारी याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील अनेक नागरिकांकडून यापूर्वीही पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी करण्यात आल्याची चर्चा असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या नगर परिषद शाखेचे अधिकारी विनोद जाधव यांनी सदर घटनेच्या प्रकरणी वरिष्ट पातळीवरून चौकशीचे आदेश दिल्याचे, तसेच संबंधित अभियंता घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमाला दिली. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिल्याने आता या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते आणि नुकसानग्रस्तांना न्याय मिळतो का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











