– पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थकारक घटना टळली
The Exposer
नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या सतर्कता, धाडस आणि तात्काळ कारवाईमुळे एक संभाव्य रक्तरंजित गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच हाणून पाडण्यात यश आले आहे. गिट्टीखदान पोलिसांनी शुक्रवारी दाभा परिसरात धाडसी छापा टाकत कुख्यात गुन्हेगार अब्बास सय्यद खान (वय २५, गणेशनगर) आणि त्याचा साथीदार ऋतिक नाईक (वय २५) यांना अटक केली. आरोपींकडून तीन देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे, तलवारी आणि चाकू असा शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अब्बास हा आपल्या साथीदारासह दाभा रिंगरोडवरील एका कॅफेमध्ये देशी पिस्तुलासह उपस्थित असून गंभीर गुन्हा घडविण्याच्या तयारीत होता. माहितीची गांभीर्याने दखल घेत गिट्टीखदान पोलिसांनी परिसराला वेढा घालून छापा टाकला. झडतीदरम्यान आरोपीकडून एक देशी पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली.
यानंतर पोलिसांनी आरोपीच्या निवासस्थानी छापा टाकला असता आणखी दोन देशी पिस्तुले, अनेक तलवारी आणि धारदार चाकू हस्तगत झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने आरोपींचे नेमके मनसुबे काय होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, अब्बास सय्यद खान याच्यावर २०२२ मध्ये वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा आरोप असून त्याच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली होती. अशा सराईत आणि कुख्यात गुन्हेगाराला वेळेत जेरबंद करून गिट्टीखदान पोलिसांनी संभाव्य मोठी घटना रोखल्याचे मानले जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गिट्टीखदान पोलिसांच्या या धाडसी, नियोजनबद्ध आणि वेगवान कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











