भरतवाड्यात तर्रीच्या किरकोळ वादातून युवकांची हत्या

– कळमना पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध दाखल केला गुन्हा
The Exposer
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात तर्रीच्या पाण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच हिंसक वळण घेत एका युवकाच्या मृत्यूत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात महिला व कुटुंबीयांसह सहा जणांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मृतक योगेश बीरसिंग साहू (वय 27) हा आपल्या मित्रांसोबत भरतवाडा रोडवरील एका नाश्ता केंद्रावर गेला होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मंगेश नावाच्या युवकाने योगेशला “तुझ्या हातातील नाश्त्यातील तर्री माझ्या चेहऱ्यावर उडाली” या कारणावरून जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

वाद मिटविण्यासाठी संबंधित युवकाला पोलीस ठाण्यात जाण्याचे सांगितल्यानंतर तो तेथून निघून गेला. काही वेळाने त्याने आपल्या नातेवाईकांना व परिचितांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर प्रफुल्ल बांते, शिवानी पिल्लारे, तिची आई, राजेश पिल्लारे तसेच शुभम पिल्लारे यांनी मिळून योगेश व त्याच्या मित्रांशी वाद घालत मारहाण सुरू केल्याचा आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरुवातीला लाकडी बल्ली व हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर शुभम पिल्लारे हा घरातून चाकू घेऊन बाहेर आला आणि योगेशवर सपासप वार केल्याचे सांगण्यात आले आहे. योगेशला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्याच्या भावालाही चाकूने जखमी करण्यात आले.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी कळमना पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध हत्येसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More