न्यायालयाचा दणका! ६.२० कोटींच्या चणा घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

The Exposer
नागपूर : नागपूरातील व्यापाऱ्यांची तब्बल ६ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या तिन्ही आरोपींना मोठा धक्का बसला असून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. त्यामुळे आरोपींच्या अटकेचा मार्ग अधिक मोकळा झाला असून फसवणुकीच्या या गाजलेल्या प्रकरणात फिर्यादी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दाल इंडस्ट्रीज व डी.एन. इंडस्ट्री या दोन कंपन्यांनी चणा खरेदीसाठी आरोपी विवेक शंकरलाल मतानी, संकेश्वर भारत सिंग आणि उमर गुलाबसाहेब शेख यांना एकूण ६.२० कोटी रुपये आगाऊ स्वरूपात दिले होते. मात्र, आरोपींनी कोणत्याही प्रकारचा चणा मालाचा पुरवठा न करता व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींनी अटकेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मा. जिल्हा न्यायाधीश ब्रह्मानंद एम. धानुरे यांनी दिनांक २० जून २०२६ रोजी आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे फसवणुकीच्या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ऍड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली, तर फिर्यादी पक्षाच्या वतीने ऍड. प्रकाश जयस्वाल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. आरोपी मतांनीच्या वतीने ऍड. सोहेलुद्दीन शेख, आरोपी सिंगच्या वतीने ऍड. राजेश तिवारी, आरोपी उमर शेखच्या वतीने ऍड. अतिक उर रहेमान यांनी बाजू मांडली.

फिर्यादी पक्षाच्या मते, व्यापाऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून न्यायालयाच्या निर्णयामुळे पीडितांना न्याय मिळण्याची आशा अधिक बळावली आहे. आरोपींविरुद्ध आता पोलिसांची कारवाई अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More