दीक्षाभूमी ते संविधान चौक दणाणला

-अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात फुले-शाहू-आंबेडकरी संघटनांचा विराट मोर्चा; नागपुरात जनआक्रोशाचा महासागर

The Exposer
नागपूर : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज नागपुरात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग तिरंगा व निळ्या झेंड्यांनी आणि संविधान बचावाच्या घोषणांनी दणाणून गेले.

सकाळपासूनच दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊ लागले होते. हातात संविधान, तिरंगा व निळे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन आंदोलकांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. “संविधान वाचवा”, “आरक्षणावर घाला चालणार नाही”, “सामाजिक न्याय अबाधित ठेवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मोर्चा दीक्षाभूमी येथून निघून शहरातील प्रमुख मार्गांवरून संविधान चौकात पोहोचला. मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करत शासनाला इशारा दिला की, सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही.

मोर्च्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे नागपुरातील आंबेडकरी चळवळीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. संविधान चौकात झालेल्या सभेत विविध संघटनांच्या नेत्यांनी आपली भूमिका मांडत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More