– आंबेडकरी विचारांच्या जागृतीसाठी आयुष्य वाहिलेल्या कवी विवेक मोरे लवकरच ‘उठाव’च्या कविसंमेलनातून पुन्हा जनतेसमोर
The Exposer
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील प्रभावी कवी, वक्ते आणि सामाजिक प्रबोधनाचे अखंड योद्धा म्हणून ओळख असलेले कवी विवेक मोरे यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर यशस्वी मात करत पुन्हा समाजजागृतीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ऑपरेशननंतर प्रथमच त्यांनी समाजमाध्यमांवर आपला फोटो प्रसिद्ध केला असून, या पोस्टने त्यांच्या चाहत्यांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना भावनिक केले आहे.

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात त्यांच्यावर कॅन्सरचे मोठे ऑपरेशन झाले होते. त्या काळात त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे ऑपरेशननंतर त्यांची अवस्था कशी आहे, याची माहिती केवळ काही जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच होती. अलीकडेच त्यांचे सहकारी सागर साखरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन पत्नी वनिता मोरे यांच्या समवेत त्यांचा सेल्फी काढला. हाच फोटो त्यांनी प्रथमच समाजमाध्यमांवर शेअर केला.
या पोस्टमध्ये विवेक मोरे यांनी आपल्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे सांगितले आहे. आता आपण व्यवस्थित बोलू शकत असून, लवकरच ‘उठाव’च्या कविसंमेलनात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. “अजून बर्याच वस्त्या जागवायच्या आहेत. जागृतीचा विस्तव विझू नये, यासाठी पुन्हा मैदानात उतरतोय. बचेंगे तो और भी लढेंगे!” या त्यांच्या शब्दांतून समाजपरिवर्तनासाठीची त्यांची जिद्द आणि निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
कवी विवेक मोरे यांनी आपल्या कविता, भाषणे आणि सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्षे आंबेडकरी विचार, सामाजिक समता, संविधान मूल्ये आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या कवितांनी विशेषतः तरुणांमध्ये सामाजिक भान जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
गंभीर आजाराशी दोन हात करूनही समाजकारण आणि परिवर्तनाच्या ध्येयापासून ते विचलित झाले नाहीत. त्यांच्या पुनरागमनामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, ‘उठाव’च्या आगामी कविसंमेलनात त्यांच्या उपस्थितीची उत्सुकता वाढली आहे.
कॅन्सरवर विजय मिळवून पुन्हा समाजजागृतीच्या प्रवासाला सज्ज झालेले कवी विवेक मोरे यांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक लढा नसून, विचारांसाठी जगणाऱ्या आणि समाजपरिवर्तनासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या “अजून बऱ्याच वस्त्या जागवायच्या आहेत” या निर्धारपूर्ण घोषणेतूनच त्यांच्या जीवनाचे ध्येय आणि चळवळीप्रती असलेली अखंड बांधिलकी स्पष्ट होते.
Author: संतोष तायडे
संपादक











