– गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ₹73 हजारांचा मुद्देमाल जप्त, भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल
The Exposer
नागपूर : नागपूर शहरात सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एका तरुणाच्या घरातून देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुसे आणि धारदार तलवार जप्त केली. या कारवाईत एकूण ₹73 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (4 जुलै) पहाटे सुमारे 2.15 वाजता शहरातील कोंबिंग मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना सामाजिक सुरक्षा विभागाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार प्रेमसिंग जितेंद्र बैस (वय 22, रा. प्लॉट क्र. 685, सुदामपुरी, भांडे प्लॉट चौक, सक्करदरा) याने आपल्या घरात बेकायदेशीर अग्निशस्त्र लपवून ठेवल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पंचांसह छापा टाकला.
छाप्यात आरोपीच्या घरातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल (मॅगझिनसह), पाच जिवंत काडतुसे, एक लोखंडी तलवार आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹73 हजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार प्रकाश माथनकर यांच्या फिर्यादीवरून सक्करदरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीकडे अग्निशस्त्र कशासाठी होते आणि त्याचा इतर कोणत्याही गुन्ह्याशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











