‘मानवसेवेलाच धर्म मानणारे चंदननगरचे देवदूत’; सहा समाजसेवकांचा निस्वार्थ सेवाव्रत ठरत आहे अनेकांसाठी जीवनदायी!

– गरीब रुग्णांना उपचारापासून रक्तदात्यांपर्यंत मदत, कौटुंबिक वाद मिटविण्यापासून सामाजिक उपक्रमांपर्यंत अखंड धावपळ; सेवाभावाची प्रेरणादायी गाथा

The Exposer
नागपूर : आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात निस्वार्थपणे समाजासाठी झटणारी माणसे म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. नागपूरच्या चंदननगर परिसरातील सहा समाजसेवकांची अशीच एक टीम गेल्या अनेक वर्षांपासून “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हा संदेश आपल्या कार्यातून देत आहे. या सेवाकार्यात प्रमुख भूमिका सामाजिक कार्यकर्ते संजय समरीत यांची असून त्यांच्या प्रेरणेतून अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत.

या सेवाभावी समूहात संजय समरीत (शिक्षक सहकारी बँकेत कर्मचारी), बंडू गायकवाड (खाजगी नोकरी), दिनेश लोंदासे (भाजी विक्रेता), अरुण पापणकर (औषध दुकान व्यवसाय), जयश्री गभने आणि वंदना सिरसागर (सामाजिक कार्यकर्त्या) यांचा समावेश आहे. व्यवसाय, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ही मंडळी दिवस-रात्र गरजूंना मदतीचा हात देत असतात.

मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब आणि निराधार रुग्णांना रुग्णालयात दाखल करून देण्यापासून त्यांच्या औषधांची व्यवस्था करणे, जेवणाचा डबा पोहोचविणे, रक्तदान करणे किंवा रक्तदाते उपलब्ध करून देणे, अशा असंख्य सेवा ही टीम सातत्याने करत असते. एवढेच नव्हे तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची दररोज भेट घेऊन त्यांची विचारपूस करणे हेही त्यांनी आपले कर्तव्य मानले आहे.

या समूहातील दोन्ही महिला कार्यकर्त्या जयश्री गभने आणि वंदना सिरसागर या दिवस-रात्र, ऊन-पाऊस, वारा याची कोणतीही पर्वा न करता मदतीसाठी धावून जातात. अनेकदा दोघी एकाच दुचाकीवरून गरजूंना मदत करण्यासाठी पोहोचतात. त्यांचा सेवाभाव अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

रुग्णसेवेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्येही ही टीम सक्रिय असते. एखाद्या संकटग्रस्त कुटुंबाचा फोन आला किंवा कोणीतरी अडचणीत असल्याची माहिती मिळाली की, ही मंडळी नातेसंबंध, जात, धर्म किंवा पंथ न पाहता तत्काळ मदतीसाठी धाव घेतात. त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. विविध आरोग्य विषयीचे शिबीर, समाज प्रबोधनासह जनजागृतीच्या कार्यक्रमावर त्यांचा भर असतो.

पती-पत्नीतील कौटुंबिक वाद सोडवून संसार पुन्हा उभे करण्याचे कामही त्यांनी अनेकदा केले आहे. चंदननगर येथील मिल कामगारांच्या पीटीएस क्वार्टर परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांद्वारे संजय समरीत यांनी समाजकार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या कुटुंबावरही दिसून येतो. पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत असलेला त्यांचा मुलगाही आपल्या व्यस्त नोकरीतून वेळ काढून गरजूंच्या मदतीसाठी धावून जातो. समाजसेवेचे हे संस्कार त्याला वडिलांकडूनच लाभले आहेत.

या सहा समाजसेवकांचा सेवाभाव हेच त्यांचे खरे बळ आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान आणि हास्य हीच त्यांची ऊर्जा आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, कुठलाही भेदभाव न करता सुरू असलेले त्यांचे कार्य समाजासमोर मानवतेचा आदर्श निर्माण करणारे आहे. समाजात अशा निस्वार्थ सेवाभावी व्यक्तींचा सन्मान झाला, तर समाजसेवेची प्रेरणा अधिक बळकट होईल. चंदननगरच्या या “देवदूतां”चे कार्य अनेकांना समाजासाठी काहीतरी करण्याची नवी दिशा देणारे ठरत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More